Eknath Shinde Sanjay Raut Shivsena BJP: महाविकास आघाडीतील शिवसेनेचे बडे नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्रीपासून बंड पुकारलं. शिवसेनेच्या काही भूमिका आणि पक्षातील काही नेत्यांवर असलेल्या नाराजीबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कैफियत त्यांनी मांडली होती. पण तरीही काही तोडगा न निघाल्याने शिवसेनेच्या ३०हून जास्त आमदारांसह त्यांनी गुजरातमधील सुरतच्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला. घडलेल्या प्रकारानंतर खडबडून जागी झालेल्या शिवसेनेने एक शिष्टमंडळ एकनाथ शिंदेंशी चर्चेसाठी पाठवलं होतं. त्यावेळी, शिवसेनेने भाजपाशी पुन्हा युती करावी आणि राज्यात युतीचं सरकार आणावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलताना केल्याचे सांगण्यात आले. या मुद्द्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं.
भाजपा आणि शिवसेना यांना २०१९च्या निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतरही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या मदतीने महाविकास आघाडी स्थापन केली. महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यात संजय राऊत अतिशय सक्रियरित्या सहभागी झाले होते. त्यांनी पुन्हा भाजपाशी युती करण्याबाबत काय प्रतिक्रिया दिली पाहा-
"एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून जी चर्चा झाली त्याबद्दल काही बाबी समजल्या आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्ता स्थापन करावी अशी त्यांची भूमिका आहे हे आज सकाळपासूनच समजलं आहे. आणि शिवसेना हा पक्ष अटी-शर्तींवर चालत नाही. एका विशिष्ट परिस्थितीत शिवसेनेला भाजपापासून दूर व्हावं लागलं. २५ वर्षांची युती ज्या परिस्थितीत तोडावी लागली त्याची एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे. कशाप्रकारे शिवसेनेचा अपमान झाला आणि दिलेला शब्द भाजपाने पाळला नाही, याविषयी एकनाथ शिंदे यांना कल्पना आहे. त्यामुळे याबद्दल त्यांची नवीन भूमिका काय मला माहिती नाही", अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपाशी शिवसेनेची युती शक्य नाही असे सूचित केले.
दरम्यान, शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर, रवींद्र फाटक सूरतला पोहचले होत. यावेळी एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून १५ मिनिटे संवाद झाला. त्यात नार्वेकरांच्या फोनवरून दोन्ही नेत्यांचे बोलणं झाले. या संवादात एकनाथ शिंदे यांनी 'तुम्ही तुमचं ठरवा, मी माझं ठरवतो' असं संतापून म्हणाल्याचे सांगितले. एकीकडे चर्चा, दुसरीकडे अपहरणाचा आरोप, तिसरीकडे गटनेटेपदावरून काढलं असं का केले? असे खडे सवाल त्यांनी विचारले. 'मी कुठलाही गट अथवा पक्ष स्थापन केलेला नाही. कुठेही मुख्यमंत्रिपदाबाबत बोललो नाही मग गटनेते पदावर काढलं का?', असा सवालही त्यांनी केला.