Sanjay Raut News: ईडीने बजावलेल्या नोटिसीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार ईडी कार्यालयात हजर झाले. रोहित पवार यांच्यासोबत आत्या खासदार सुप्रिया सुळे ईडी कार्यालयात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि रोहित यांचे आजोबा शरद पवार हे ईडी कार्यालयाजवळ असलेल्या पक्षाच्या कार्यालयात दिवसभर थांबणार आहेत. यातच ईडीच्या नोटिसीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका करत, रोहित पवारांना संपूर्ण महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र तपास यंत्रणा राहिली नाही, तर भाजपाची शाखा झाली आहे. एकीकडे प्रभू श्रीरामाची पुजा करायची आणि दुसरीकडे आवाज दाबायचा असा प्रकार सुरु आहे. महाविकास आघाडी ही रोहित पवार यांच्या पाठिशी आहे. आमची लोकशाहीची लढाई आहे ती कायम सुरु राहील, असे संजय राऊत यांनी सांगितले.
रोहित पवार यांच्या मागे राष्ट्रवादी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र
जे लोक भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये जाण्यासाठी तयार नाहीत. त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. मी त्या त्रासातून गेलो आहे आणि अजूनही कुटुंब जाते आहे. रोहित पवार यांच्या मागे राष्ट्रवादी नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. पश्चिम बंगाल मध्ये ईडीने कारवाई केली. आसामचे मुख्यमंत्री हे सर्वात भ्रष्ट आहेत तर ते भाजपासोबत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण ईडीग्रस्त आहेत. ईडीला घाबरून तिकडे गेले. ईडी तिथे नोटीस पाठवत नाही. पेडणेकर, चव्हाण, वायकर यांना नोटीस पाठवते. ईडी संजय राऊत यांना अटक करते. जे भाजपाच्या भ्रष्टाचार बाहेर काढतात त्यांना आत टाकले जाते, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता शांत झोप लागत असेल, कारण ते भाजपासोबत गेले. सध्याचे मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या भयाने पक्षातर केले, अनेकजण ईडी ग्रस्त आहेत, असे संजय राऊतांनी सांगितले.