Sanjay Raut News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून, पक्ष सोडण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, खुद्द अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत खुलासा केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातच आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून प्रतिक्रिया येत असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे, असे म्हटले आहे.
आगामी २०२४ च्या निवडणुकीनंतर काय, आता म्हटले तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे. मला १०० टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. या दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. ठाकरे यांच्यासोबत आनंदाने, समाधानाने काम केले. पण, चव्हाण यांच्यासोबत नाईलाजाने आणि वरिष्ठांनी सांगितल्यामुळे काम केले, असा खुलासा अजित पवार यांनी केला. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांना शुभेच्छा आहेत
अजित पवारांनी प्रथमच मुख्यमंत्रीपदाबाबत इच्छा व्यक्त केली नाही. त्यामुळे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत. मुख्यमंत्री होण्यास कोणाला आवडणार नाही. अजित पवारांमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. ते अनेक वर्षापासून राजकारणात असून, मंत्रीही होते. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटते आपण मुख्यमंत्री व्हावे. अनेकजण जुगाड करून लायकी नसताना मुख्यमंत्री होतात, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
दरम्यान, सन २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७१ तर काँग्रेसचे ६९ आमदार निवडून आले होते. त्यावेळी मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी मिळेल अशी शक्यता होती. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनाही तसेच वाटत होते. पण, दिल्लीत काय घडले माहिती नाही. काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद दिले गेले. पण, त्यावेळी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद आले असते तर कदाचित दिवंगत आर. आर.पाटील मुख्यमंत्री झाले असते, असे अजित पवार यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"