मुंबई: आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल पक्षही यावेळी गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे चुरस आणखी वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. यातच महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करणार का, अशी विचारणा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना करण्यात आली.
गोवा विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसनेही गोव्यात विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही मैदानात उतरली आहे. गोव्यामध्ये शिवसेनेचे सरकार आले तर महाराष्ट्राप्रमाणे चांगली कामगिरी करणारे सरकार देईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला होता. यानंतर मीडियाची बोलताना पत्रकारांनी महाविकास आघाडी सरकारबाबत प्रश्न विचारले असता संजय राऊत यांनी यावर भाष्य केले.
गोव्यातही महाविकास आघाडी सरकार स्थापन करणार का?
गोव्यातही महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यावर आताच भाष्य करणे घाईचे ठरेल. यावर बोलण्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत चर्चा सुरु आहेत. इतक्यात काही सांगू शकत नाही. सर्व पक्षांबरोबर चर्चा सुरु आहे. समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला, तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. ज्या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे, तिथल्या लोकांसोबतच चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे
महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. शिवसेना गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये ४० जागांपैकी २२ जागांवर निवडणूक लढवणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते तर महाराष्ट्र गोव्याच्या बाजूलाच आहे, असे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.