“काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता?”; संजय राऊतांचा अजित पवारांना थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:58 AM2023-04-19T11:58:47+5:302023-04-19T12:00:09+5:30

अजित पवार यांनी केलेल्या टीकेचा संजय राऊत यांन रोखठोक शब्दांत समाचार घेत प्रत्युत्तर दिले.

sanjay raut replied ncp ajit pawar criticism over claims of displeasure in the party issue | “काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता?”; संजय राऊतांचा अजित पवारांना थेट सवाल

“काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता?”; संजय राऊतांचा अजित पवारांना थेट सवाल

googlenewsNext

Sanjay Raut News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार पक्षाला सोडचिठ्ठी देणार, आमदारांचा गट घेऊन भाजपसोबत जाणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर झाल्या. मात्र, खुद्द अजित पवार यांनी या सगळ्या प्रकारावर स्पष्टीकरण दिले आणि कुठेही जाणार नसल्याचा खुलासा केला. यातच आता अजित पवार यांनी केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. काय चुकीचे लिहिले, माझ्यावर का खापर फोडता, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चालले, हे इतरांनी कुणी सांगू नये. तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहात का, आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेले नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावे, असे रोखठोक भाष्य अजित पवार यांनी केले. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर देताना, सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचे लिहिलेले नाही. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? सत्य लिहिले आहे आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावे, असे घडत नाही का, असा रोकडा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. 

आम्ही चिंता व्यक्त करण्यात काहीही चुकीचे नाही

महाविकास आघाडीत आम्ही अजित पवारांवर प्रेम करतो. पण हा पक्ष फुटत असताना आम्ही चिंता व्यक्त करण्यात काहीही चुकीचे नाही. महाविकास आघाडीचा मी चौकीदार आहे. त्यामुळे बोललो. अजितदादा माझ्यावरच खापर का फोडतायत? शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. आपल्या बरोबरचा घटकपक्ष मजबूत रहावा, त्याचे लचके तुटले जाऊ नये, ही आमची भूमिका असेल, तरीही कुणी आमच्यावर खापर फोडत असेल तर गंमत आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, खरे बोलल्यामुळे मला कुणी टार्गेट केले आणि त्यामुळे मी मागे हटेन, असे वाटत असेल तर तसे नाही. मी नेहमीच खरे बोलतो. कुणाच्या बापाला घाबरत नाही. सामनात नेहमीच सत्य लिहिले जाते. त्यात लपवण्यासारखे काहीच नाही. पवार कुटुंबियांवर दबाव आहे. त्यासोबत राष्ट्रावादी काँग्रेसमधील हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांवरही दबाव आहे. ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून भाजप ऑपरेशन करते. यावर आम्ही बोललो तर भाजपला राग यायला हवा. इतर कुणाला राग यायचे कारण नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: sanjay raut replied ncp ajit pawar criticism over claims of displeasure in the party issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.