Sanjay Raut on Gulabrao Patil : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय होऊनही, सरकार स्थापनेबाबत तिन्ही पक्षांमध्ये गोंधळ अद्याप कायम आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष (भाजप), एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची यांचा समावेश आहे. शिवसेनेने एकसंध राहून त्यांच्यासोबत निवडणूक लढवली असती तर महायुतीला मोठा विजय मिळाला असता, असेही भाजप नेते सांगत आहेत. तर दुसरीकडे शिंद गटाच्या नेत्यांनी शिवसेना फुटल्याचा ठपका संजय राऊत यांच्यावर ठेवला आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचे म्हटलं आहे.
शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा भाग नसता तर विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ९०-१०० जागा जिंकता आल्या असत्या असं म्हटलं. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला होता. शिवसेना फुटल्याचा ठपका त्यांनी संजय राऊत यांच्यावर ठेवला. तसेच १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचेही ते म्हणाले. गुलाबराव पाटलांनी केलेल्या दाव्यावर संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.
"गुलाबराब पाटील तुम्ही थोडे दिवस थांबा तुमचा पक्ष शिल्लक राहतो का आणि भाजप तो शिल्लक ठेवतो का हे तुम्हाला कळेल. आता आमच्याकडे जे राहिलेले आहेत ते निष्ठावंत आहेत. तुमच्यासारखा पालापाचोळा उडून गेला आहे. ईडी, सीबीआयने फुंकर मारताच तुमच्यासारखे लोक उडून गेले. आता आमचा निष्ठावतांचा मेळा उरला आहे," असं संजय राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत लवचीकता दाखवायला हवी होती का असा सवाल माध्यमांनी विचारला. "तुमच्याकडे चुकीची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे. तेव्हा जर ते मूळ शिवसेनेला दिलं असतं तर आज ही वेळ आली नसती. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना जो भाजप पक्ष मुख्यमंत्रीपद देऊ शकतो तो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला द्यायला तयार नव्हता. कारण त्यांना मूळ शिवसेना नष्ट करुन या राज्यामध्ये डुप्लिकेट शिवसेना उभी करायची होती," असं संजय राऊतांनी म्हटलं.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
“त्यांच्या (उद्धव ठाकरे) महालामध्ये आमच्या सारख्यांची देखील एक वीट आहे. मात्र, त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊत यांच्यासारखा एक दगड घेऊन आले आणि त्या दगडाने त्यांच्या महालाचा पूर्ण सत्यानाश करून टाकला. ते जळगाव जिल्ह्यात येऊन आमच्या पाच जागा पाडणार होते. दोन-दोन दिवस जिल्ह्यात येऊन बसले, पण साधा एक उमेदवार ते वाचू शकले नाहीत. त्यामुळे संजय राऊतांना आतातरी हे ओळखावं आणि उद्धव ठाकरे यांनीही संजय राऊतांना ओळखावं. अन्यथा जे २० आमदार आहेत ना? त्यातील १० आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत. आगे-आगे देखिए होता है क्या”, असं गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.