मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिवाळीच्या दिवशी भाजप-शिवसेनेत सत्तास्थापनेबाबत एक बैठक ठरली होती. परंतु त्या बैठकीच्या एका तासापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मुख्यमंत्री'पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे केलेल्या वक्तव्यामुळे ही बैठक रद्द झाली. असा खुलासा संजय राऊत यांनी केला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीवेळी ते बोलत होते.
विधानसभा निवडणुकीत युतीला बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा दोन्ही पक्षातील सुरु असलेला सत्तासंघर्ष काही थांबायला तयार नाही. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत 50-50चा आग्रह धरत अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचीही मागणीवर अडली आहे. मात्र ह्या सर्व वादात दोन्ही पक्षाकडून चर्चेसाठी प्रयत्न केला जात आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेबाबत या दोन्ही पक्षातील नेत्यांची बैठक होणार होती. ज्यात भाजपकडून महाराष्ट्राचे प्रमुख भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई असणार होते. मात्र बैठकीच्या एका तास आधीच मुख्यमंत्री यांनी 'मुख्यमंत्री'पदाचा कोणताही फॉर्म्युला निवडणुकीच्या आधी ठरला नसल्याचे सांगितल्याने ही बैठक रद्द झाली. त्यामुळे पुढे कोणतेही चर्चा होऊ शकली नसल्याचे राऊत म्हणाले.
दोन्ही पक्षात बंद झालेल्या चर्चेला भाजप जवाबदार आहेत. तसेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी हा प्रश्न राज्याच्या नेत्यांवर सोपवला आहे. मात्र राज्याचे नेते हा प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरले असून त्याला आम्ही जवाबदार नसल्याचे राऊत म्हणाले. चर्चेचे अधिकार भाजपमध्ये कुणाकडे आहे हेच कळत नाही. कारण सर्वच अदृश्य असून पडद्यामागे कोणती पटकथा लिहली जात आहे हे मला माहित नाही. परंतु शिवसेनेची पटकथा तयार असल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.