संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांना PM पदाची संधी मिळाली तर शरद पवार...; पटोलेंनी केला पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 04:51 PM2024-04-20T16:51:22+5:302024-04-20T16:52:20+5:30
राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत? याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर, शरद पवार पाठिंबा देतील, असे वक्तव्य संजय राऊत यांनी सांगलीमध्ये पत्रकारासोबत बोलताना केले. राउतांच्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राउतांवर थेट निशाणा साधला आहे.
काय म्हणाले पटोले? -
"संजय राऊत रोज आपलं वक्तव्य बदलतात. त्यामुळे संजय राउतांच्या वक्तव्याला फार काही महत्व देऊ नका. कालपर्यंत राहुल गांधींना पंतप्रधान बनवायला निघाले होते. आज आता त्यांन उद्धव ठाकरे दिसत आहेत. यामुळे त्यांच्या या पद्धतीच्या वक्तव्याकडे फार काही लक्ष देऊ नका आणि संजय राउतांनीही अशा पद्धतीचे वक्तव्य करू नेये."
नेमकं काय म्हणाले होते राऊत? -
"उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत पंतप्रधान का असू शकत नाहीत, याचा निर्णय इंडिया आघाडीत बसून घेतला जाईल. शरद पवार यांचे कर्तृत्व असताना त्यांना हे पद मिळले नाही. उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केले आहे. आमच्याकडे जास्त चेहरे आहेत. मोदी एके मोदी नाही. पंतप्रधान पदाची संधी उद्धव ठाकरे यांना मिळाली तर शरद पवार पाठिंबा देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान का मिळू नये, असा सवालही संजय राऊत यांनी केला.
"राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात" -
देशात इंडिया आघाडीला लोकसभा निवडणुकीत 300 पेक्षा जास्त जागा मिळतील, तर राज्यात 35 पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जमा होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच, दूरदर्शन हे भाजपा प्रणित झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. लोगो भगवा झाला म्हणून हिंदुत्वव उजळून निघाला असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला. अजित पवार यांचा एकही खासदार निवडून येणार नाही, भविष्यात ते भाजपात विलीन होईल, असा टोला संजय राऊत यांनी हाणला. तर बारामतीमधून सुप्रिया सुळे या बहुमताने निवडून येतील असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.