INDIA Alliance: इंडिया नव्हे, भारत..!! पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. राज्यघटनेतून इंडिया हा शब्द काढून टाकण्यावर यापूर्वीही भर देण्यात आला होता, त्यातच आता पुन्हा याबाबत मोठे पाऊल उचलले जाऊ शकते, असे म्हटले जात आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीतील पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. दुसरीकडे, मुंबईतील बैठकीनंतर आता इंडिया आघाडीची पुढील रणनीति ठरवली जात असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, १३ सप्टेंबर २०२३ रोजी शरद पवारांनी त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला आम्ही जाणार आहोत. या बैठका आता यापुढे सुरु राहतील त्याप्रमाणे आम्ही काम करु, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. इंडिया आघाडीच्या आजवर तीन बैठका पार पडल्या आहेत. पाटणा, बंगळुरु आणि मुंबईत अशा अनुक्रमे या बैठका झाल्या.
विविध समित्यांची बैठकांचे सत्र
इंडिया आघाडीची यानंतरची पुढील बैठक दिल्ली, भोपाळ, चेन्नई किंवा कोलकाता या ठिकाणी होणार आहेत. पण शेवटच्या मुंबईतील बैठकीत ज्या विविध समितीत्यांची स्थापना झाली. याच समित्या यापुढे बैठका घेणार आहेत. या समित्यांपैकी महत्वाची समिती म्हणजे समन्वय समिती आहे. या समितीतील वरिष्ठ सदस्य आहेत शरद पवार. त्यामुळं येत्या १३ सप्टेंबरला शरद पवार यांनी आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.
दरम्यान, आम्ही इंडिया नाव दिल्याने देशाच्या नावाची भीती वाटते, तुम्ही काय काय बदलणार आहात? भारत हाच इंडिया आहे. संविधान बदलण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? तुम्हाला नवी भारत बनवायचा आहे तर रिपब्लिक ऑफ भारत करा. या देशातील जनता हे मंजूर करणार नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. तसेच एक देश, एक निवडणूक हा फ्रॉड आहे. राजकीय स्वार्थासाठी असे फ्रॉड करण्यात आलेत. देश लुटण्याचे, खड्ड्यात घालण्याचे अजून एक फ्रॉड आहे, असा हल्लाबोलही संजय राऊतांनी केला.