Sanjay Raut News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहून २० जून रोजी जागतिक गद्दार दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना लिहिलेल्या पत्रात संजय राऊत यांनी २० जून हा दिवस जागतिक गद्दार दिन म्हणून ओळखला जावा, असे म्हटले आहे. तशी विनंती करणारे पत्र संजय राऊतांनी पाठवले आहे. यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी प्रयत्न करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तसे कळवले आहे. पंतप्रधान युनोमध्ये जाणार आहेत. त्यांना माझे आवाहन आहे. जसे त्यांनी योगा डे साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न केलेत. तसे यासाठी पुढाकार घ्यावा. कारण महाराष्ट्रात गद्दारी व्हावी म्हणून त्यांनीही प्रयत्न केलेले आहेत. या गद्दारीत त्यांचेही योगदान आहे. त्यामुळे त्यांना याची तीव्रता लक्षात येत असेल. त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करावा, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.
या गद्दारीची दखल जगातल्या ३३ देशांनी घेतली
संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून अनेक दिवस साजरे केले जातात. आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करतो, योगा डे साजरा करतो. तसेच देशाच्या लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस आहे. या गद्दारीची दखल जगातल्या ३३ देशांनी घेतली असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मला वाटते की, जगात अशा घटना घडत असतील पण ही सर्वात भयंकर घटना होती. त्यामुळे या दिवशी गद्दारांना जोडे मारावेत. त्यांचे स्मरण करावे, यासाठी या दिवसाची जागतिक गद्दारी दिवस म्हणून आजचा दिवस साजरा व्हावा, असे संजय राऊत यांनी सांगितले जाते.
दरम्यान, गेल्या वर्षी २० जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले होते. यानंतर उद्धव यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले. संजय राऊत यांनी यूएनला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी आमच्या पक्षाच्या ४० आमदारांसह भाजपच्या मदतीने आमचा पक्ष सोडला. त्यांना ५०-५० कोटी रुपये मिळाले. आमचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी हे केले. त्यामुळे २० जून हा गद्दार दिवस साजरा करावा असा प्रस्ताव संजय राऊतांनी मांडला.