Maharashtra Politics: आताच्या घडीला अजित पवार भाजप प्रवेश करण्यावरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या पाठिशी ४० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी भाष्य करताना भाजप तसेच शिंदे गटावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, अजित पवार यांच्या बाबतीत भाजपकडून अफवा पसरवल्या जात आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
सध्या सुरु असलेल्या बातम्यांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या पोटात गोळा आला असेल. त्यांची अस्वस्थता समजू शकतो. अजित पवार महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचे राजकीय भविष्य महाविकास आघाडीतूनच पुढे शिखरावर जाणार आहे. त्यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी मजबूत
हाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची आघाडी मजबूत आहे. याची भीती भाजपला वाटत असून, त्यांच्या पायाखालची वाळू सरकरली आहे. म्हणूनच २०२४ पर्यंत आघाडी खिळखिळी करण्याचे कारस्थान भाजपकडून केले जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार हे महाविकास आघाडीचे आधारस्तंभ आहे. ते आघाडीचे प्रमुख नेते आहेत. अजित पवार यांच्यासंदर्भातील बातम्या खोट्या आहेत. भाजप अफवा उठवत आहेत, अशी टीका संजय राऊतांनी यावेळी करताना केली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. पक्ष शरद पवार यांच्या नावाशी बांधिल आहे. आजही शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नावाशी बांधिल आहे. आमदार फुटल्याच्या बातम्या हे अंतिम सत्य नाही. अजित पवार यांच्याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्या भाजप तयार करत आहे. भाजप लोकांमध्ये गोंधळ निर्माण करण्याचे काम करत आहे, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"