मुंबई:शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडसत्रावर जोरदार टीका केली. शिवसेना भवनात बोलताना संजय राऊत यांनी सध्या महाराष्ट्रात आयटीची भानामती सुरू असल्याचे म्हटले. ''आज सकाळपासून आमच्या अनेक नेत्यांवर आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर धाडी सुरू आहेत. आम्हाला त्रास देण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे,'' अशी टीका त्यांनी केली.
'सलेक्टेड लोकांवर धाडी'संजय राऊत पुढे म्हणाले की, ''आज केंद्रीय तपास यंत्रणांची महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धाडी झाल्या. भारतात सलेक्टेड लोकांवर केंद्रीय यंत्रणांची रेड सुरू आहे. देशात फक्त महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालच त्यांना दिसतो. इतर भाजपशासित राज्यात ते धाडी टाकत नाहीत. मुंबईत बीएमसी निवडणुका होईपर्यंत प्रत्येक वार्डात धाडी पडतील'', असेही राऊत म्हणाले.
'सरकार पाडण्याचा भाजपचा डाव'ते पुढे म्हणाले की, ''ईडी, आयटी अशा केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी टाकून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपला दूर करुन शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यामुळे आम्हाला त्रास देणे सुरू आहे. आमचे हे तीन पक्षांचे सरकार अस्थिर करण्यासाठी, सरकार पाडण्यासाठीच भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठीच आमच्या नेत्यांवर धाडी सुरू आहेत.''
'भाजपचे नेते भीक मागात का?'राऊत पुढे म्हणतात, ''मागील काही दिवसांत महाराष्ट्र आणि बंगालमध्ये सर्वाधिक धाडी पडत आहेत. आमच्या पक्षाच्या 14 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली. तिकडे बंगालमध्ये 7 प्रमुख नेत्यांवर कारवाई झाली. भाजपच्या नेत्यांवर काहीच कारवाई होत नाही. त्यांच्या नेत्यांकडे पैसे नाहीत का? त्यांचे नेते रस्त्यावर भीका मागततात? इनकम आणि टॅक्स फक्त आम्हीच भरतो का? असे खोचक सवालही राऊतांनी केले.
'एक सामान्य व्यक्ती 7-8 हजार कोटींचा मालक होतो''मी अनेक दिवसांपासून विचारतोय, बुलंदशहरचा एक सामान्य दूध विकणारा व्यक्ती दोन चार वर्षात 7-8 हजार कोटींचा मालक कसा झाला? त्याला आधी राहायला घर नव्हतं, आता तो मलबार हिलमध्ये आलिशान घरात राहतो. कोणत्या भाजप नेत्याची बेनामी संपत्ती त्या व्यक्तीकडे आहे? तपास यंत्रणांना ते दिसत नाही, त्यांना फक्त आमचे लोक दिसतात. सध्या ईडी आणि काही अधिकारी भाजपची एटीएम मशीन बनले आहेत', असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.