Congress Vishal Patil ( Marathi News ) : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला संघर्ष थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगलीत जाऊन काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडल्यानंतर काँग्रेस नेते व लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊतांना जोरदार प्रत्युतर दिलं. तसंच संजय राऊत दोन दिवस सांगलीत होते. त्यांनी सर्व परिस्थिती पाहिल्याने त्यांना अंदाज आला असून ते आता आपले विचार बदलतील, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.
संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना विशाल पाटील म्हणाले की, "विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षांपासून सांगली जिल्ह्यात एकसंधपणे काँग्रेस काम करत आहे. आम्ही सर्वांनी चर्चा करून लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात सांगलीची जागा काँग्रेसलाच मागायची, असं ठरवलं होतं. तसंच जिल्ह्यातून काँग्रेस निवडणूक समितीला एकमताने माझ्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र अनपेक्षितपणे या जागेवरून तिढा निर्माण झाला. त्यानंतर आम्ही याबाबत मुंबई किंवा दिल्ली स्तरावर चर्चा करण्याची सर्व जबाबदारी विश्वजीत कदम यांच्याकडे दिली. तसंच मी किंवा जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी जागावाटपावरून कोणावरही टीका केली नाही. मात्र मागील काही दिवसांपासून सांगलीच्या जागेची राज्यभरात चर्चा सुरू झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयी आम्हा सर्वांना आदर आहे. संजय राऊत जेव्हा माध्यमांसमोर येतात, तेव्हा भाजपविरोधी बोलणारा एक चांगला माणूस म्हणून आमच्यातही त्यांच्यामुळे ऊर्जा निर्माण होते. वसंतदादांच्या काळापासून मुंबईत मराठी माणसाला आवाज मिळावा, यासाठी शिवसेनेला सहकार्य करण्याचं काम करण्यात आलं. मात्र सांगलीकरांनी शिवसेनेच्या रुपात जो आवाज दिला, तोच आवाज काल सांगलीत येऊन सांगलीकरांच्या विरोधात वापरला गेला, त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनात खदखद आहे," अशा शब्दांत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
"विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेबाबत मांडलेली भूमिका ही फक्त त्यांचीच नसून ही भूमिका माझ्यासह जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांची, कार्यकर्त्यांची आणि जनतेची आहे. असं असताना त्यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं, ते कुठेतरी जाणार आहेत, असं सांगून त्यांना कमीपणा आणण्याचं काम काल संजय राऊत यांनी केलं. विश्वजीत कदम हे काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. विदर्भात ते पक्षाचा प्रचार करत आहेत. असं असताना त्यांच्यावर झालेली टीका अत्यंत दुर्दैवी आहे. सांगली जिल्ह्यात आम्ही मागील पाच वर्षांत लोकांपर्यंत जाऊन भाजपचे खासदार कसे चुकीच्या पद्धतीने काम करतायत, हे पोहोचवलं आहे. त्यात आम्हाला यश आल्याने जिल्ह्यात भाजपविरोधी वातावरण आहे. या वातावरणात आपलाही खासदार निवडून येऊ शकतो, असं मित्रपक्षाला वाटलं असेल," असा टोलाही विशाल पाटलांनी लगावला आहे.
दरम्यान, "उद्या महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत सांगलीच्या जागेबाबत काय निर्णय होतो, हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका जाहीर करू," असं विशाल पाटील यांनी सांगितलं आहे.