Sanjay Raut vs Eknath Shinde, MNS AIMIM: शिवसेनेचे बंडखोर आमदार म्हणजे एकनाथ शिंदे गट यांना आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना कोणत्या तरी पार्टीत विलीन व्हावे लागेल. अशा वेळी ते सारे लोक एमआयएम पक्षातही जाऊ शकतात, ते कम्युनिस्ट पक्षातही जाऊ शकतात, ते समाजवादी पार्टीतही जाऊ शकतात. त्यांना मनसे मध्ये जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. अशा गोष्टींमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल. पण ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, सर्व काही दिलं ते लोक जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाबाबत विधान केले.
मी कोणाच्याही भावना दुखावल्या नाहीत!
"मी बाप काढला असं लोक म्हणतात. पण मी एक ट्वीट केलंय त्यात गुलाबराव पाटीलांनीच बापाची भाषा केली आहे. त्यामुळे ही भाषा माझी नाही, त्यांची स्वत:चीच आहे. जे लोक ४०-४० वर्षांपासून आमच्या पक्षात आहेत आणि आता पळून गेले आहेत. त्यांचा आत्मा मेला आहे. ते आता एखाद्या जिवंत प्रेतासारखेच आहेत. मी कोणाच्याही आत्मा आणि भावना दुखावण्याचा प्रयत्न केलेला नाही", असे टीकेवर उत्तर देताना त्यांना स्पष्टीकरण दिले.
मतं ईडी नव्हे तर राज्यातील जनताच देणार आहे!
"गुवाहाटीत बसलेले सर्वच आमदार आमचे जवळचे लोक आहेत. पण ही कायदेशीर लढाई आहे. आता रोड फाईट आणि कायदेशीर लढाई अशी सुरू आहे. जर तुमच्याकडे ५० आमदार आहेत तर राज्यात येऊन सत्तास्थापना करा. केंद्र सरकार त्यांना सुरक्षा देत आहेत. पण लोकांचा रोष आणि संताप कोणालाही रोखता येणार नाही. महाराष्ट्रातही हवा, पाणी, हॉटेल सगळे आहेत. तिथं बसण्यापेक्षा महाराष्ट्रात परत या. तुमचा समाजाशी संपर्क तुटला आहे. परत येण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. मते ईडी नव्हे, तर जनता देणार आहे", असं सूचक विधान त्यांनी केलं.
दाऊदचं नंतर पाहू, आधी देशात काय घडतंय पाहा!
"जे लोक आमच्या दाऊद संदर्भात गप्पा करत आहेत, ते स्वत: मेहबुबा मुफ्तींच्या सोबत सरकारमध्ये असलेल्यांची साथ कशी काय देत आहेत. त्यामुळे दाऊदचं नंतर पाहून घेऊ. चीन भारतात घुसलंय, काश्मीरात काश्मिरी पंडितांची हत्या झालीय. भारतीय जवान मारले जात आहेत हे आधी पाहा. डोळ्यासमोरील दारं उघडा आणि विचार करा", असा सल्लाही राऊतांनी दिला.