नाशिक-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला मारहाणीच्या प्रकरणावरुन गोत्यात सापडलेले नितेश राणे यांचं प्रकरण आता दिवसेंदिवस आणखी तापत आहे. नितेश राणेंचा पोलीस शोध घेत असून ते नेमके कुठे आहेत याबाबत कुणालाच माहिती नाही. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नितेश राणे पाताळत लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असं विधान केलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर जोरदार हल्ला चढवला.
"नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं. ते केंद्रीय मंत्री आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पाठिशी घालणं हा देखील एक गुन्हाच आहे. पुत्र असेल किंवा इतर कुणीही असेल राणेंनी गुन्हेगारांची माहिती पोलिसांना द्यायला हवी", असं संजय राऊत म्हणाले.
नितेश राणे नेमकं कुठे आहेत याबाबत एका प्रश्नावर बोलत असताना राऊत यांनी महत्त्वाचं विधान केलं. "कुणाला काय माहित. एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानंही त्यांना लपवून ठेवलं असेल. मी कुणाचं नाव घेत नाही. मी आताच काही बोलत नाही. कारण काही सांगता येत नाही ना..कुणाला काय माहित काही होऊ शकतं", असं म्हणत त्यांना कुणाचंही नाव घेणं स्पष्टपणे टाळलं.
नोटीस राष्ट्रपतींनाही येतात पोलिसांनी चौकशीसाठी नारायण राणे यांच्या घराबाहेरही नोटीस लावल्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी हे अतिशय किरकोळ असल्याचं नमूद केलं. देशाच्या राष्ट्रपतींनाही सुप्रीम कोर्टाच्या नोटीसा येतात. त्यात काही चुकीचं नाही. त्यांना पोलिसांच्या नोटीसीला सामोरं जावून सहकार्य करायला हवं, असं राऊत म्हणाले.