मुंबई-
एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे आवश्यक बहुमत पूर्ण झालं असून सर्व तांत्रिक बाबी झाल्या आहेत, असं विधान केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आता ही कायदेशीर लढाई आहे. त्यांच्यासोबत काही आमदार आहेत. कुणी म्हणतं ४० आहेत, कुणी म्हणतं १४० आहेत. ज्या दिवशी आमदार मुंबईत येतील त्यादिवशी त्यांच्या निष्ठेची, बाळासाहेबांवरील भक्तीची खरी कसोटी लागणार आहे. ज्यावेळी विधानसभेत हा प्रश्न जाईल तेव्हा महाविकास आघाडी सरस ठरेल यात शंका नाही", असं संजय राऊत म्हणाले.
"कागदावर संख्याबळ दिसेल पण ही लढाई आता कायदेशीर लढाई आहे. शिवसेना हा महासागर आहे आणि महासागर कधी आटत नसतो. १२ आमदारांवर कारवाईबाबत आम्ही पत्र दिलं आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय होईल आणि कायदेशीर लढाई लढली जाईल", असं संजय राऊत म्हणाले.
नारायण राणेंच्या विधानावरुन भाजपाला सवालभाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल ट्विटच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिलेल्या धमकीचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. "काही लोक आता शरद पवारांना धमक्या देऊ लागले आहेत. ज्यांनी धमकी दिली त्यांचं सोडा पण माझा प्रश्न भाजपाला आहे. हिच भाजपाची संस्कृती आहे का? याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी द्यावं. शरद पवार यांचा आदर खुद्द मोदी करतात आणि अशा नेत्याविषयी फक्त सत्ता मिळवायची आहे तीही चोरीच्या मार्गानं म्हणून धमक्या देणं चुकीचं आहे. शरद पवारांच्या वयाच्या, कामाच्या तपस्येचा आदर नसेल तर आपण मराठी म्हणून घ्यायला नालायक आहोत", असं संजय राऊत म्हणाले.