अजित पवारांना 'स्टेपनी' म्हणाले संजय राऊत आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 04:32 PM2020-01-15T16:32:21+5:302020-01-15T16:51:37+5:30
लाेकमतच्या पत्रकारिता पुरस्कार साेहळ्यात खासदार संजय राऊत यांनी राेखठाेक मुलाखत दिली.
पुणे : लाेकमत पत्रकारिता पुरस्कार साेहळ्यामधील खासदार संजय राऊत यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी राेखठाेक उत्तरे दिली. त्यांंना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेल्या सरकारबाबत विचारले असता ''हा फुसका बार ठरणार असल्याची मला खात्री हाेती. भाजप आमची स्टेपनी घेऊन गेले हाेते'' असे राऊत अजित पवारांबाबत बाेलताच सभागृहात एकच हशा पिकला.'' परंतु स्टेपनी सुद्धा महत्त्वाचा भाग असल्याचेही '' राऊत यावेळी म्हणाले.
पुण्यातील पत्रकारांचा सन्मान लाेकमत पत्रकारिता पुरस्कारातून करण्यात आला. टिळक स्मारक रंगमंदिरात रंगलेल्या या साेहळ्यात खासदार संजय राऊत यांची मुलाखत विशेष रंगली. या मुलाखतीत राऊत यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्याचे समाेर आल्यानंतर राऊत यांची प्रतिक्रीया विचारली असता ''मला काही वाटले नाही. हा फुसका बार असणार हे मला माहीत हाेते'' अशी प्रतिक्रीया राऊत यांनी दिली. तसेच ''आम्हाला ही तिसरा डाेळा आहे त्यातून आमचे लक्ष हाेते'' असेही ते यावेळी म्हणाले.
अजित पवार यांना स्टेपनीची उपमा देत ते म्हणाले, ''आमच्या गाडीचा नटबाेल्ट ढिला करायचा प्रयत्न हाेईल असे माहित हाेते. पण गाडी आमची घसरणार नाही याची खात्री हाेती. आमची चाके शाबूद हाेती. ते आमची स्टेपनी घेऊन गेले हाेते. स्टेपनी सुद्धा गाडीचा महत्त्वाचा भाग असताे. अजित पवार महत्तवाचे नेते आहेत. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अजित पवारांसह सगळे परत आले हाेते. स्टेपनीशिवाय सरकार चालू शकत नाही. अजित पवार आता महत्तवाचे चाक झाले आहेत, ते चाक आता गाडीला लागले आहे. ''
...आणि धनंजय मुंडे आमच्या साेबत असल्याचे बेधडक सांगितले.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन केल्यानंतर वायसीएम सेंटर येथे सर्व आमदार येत हाेते. परंतु धनंजय मुंडे कुठे आहेत हे काेणाला माहित नव्हते. तेव्हा धनंजय मुंडे यांच्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता धनंजय मुंडे आमच्यासाेबत असून ते 10 मिनिटात इथे येतील असे बेधडक सांगितल्याची कबुली राऊत यांनी दिली. ताेपर्यंत मुंडे यांच्याशी राऊत यांचे कुठलेही बाेलणे झाले नव्हते. मी असे बाेलल्याचे पाहून मुंडे परत आले असतील अशी टिप्पणीही राऊत यांनी यावेळी केली.