मुंबई-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या निर्णयाला असत्याचा विजय म्हटले आहे.
माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, 'खोक्यांचा वारेमाप वापर झाला. हा खोक्यांचा विजय आहे. हा सत्याचा नाही, असत्याचा विजय आहे. श्रीरामाचा धनुष्यबाण रावणाला मिळत असेल, तर सत्यमेव जयतेऐवजी असत्यमेव जयते म्हणावं लागेल. खरेदी-विक्री कुठपर्यंत गेली आहे, हे आता स्पष्ट झालं. जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला, तो पक्ष 40 बाजारबुंडगे विकत घेतात. आज निवडणूक आयोगावरचा विश्वास उडाला, असं राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणतात की, 'या देशातल्या सर्व स्वायत्त यंत्रणांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातले हे महत्वाचे पाऊल आहे. न्यायालय असेल , निवडणूक आयोग असेल, तपास यंत्रणा असेल, या गुलाम असल्यासारख्या वागत आहेत. 40 बाजारबुंडगे पैशांच्या जोरावर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि चिन्ह विकत घेऊ शकत असतील, तर या देशीतील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडून जाईल. हे सगळं दबावाखाली झालेलं आहे. महाराष्ट्रावर सूड घेण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर शिवसेनेचा अधिकार राहू नये, त्यासाठी फेकलेला फास आहे, असंही राऊत म्हणाले.