शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे आपल्या शेलक्या भाषेतील टिप्पणीने सत्ताधारी भाजपा आणि महायुतीमधीन नेत्यांना दररोज बेजार करत असतात. त्यामुळे राऊतांकडून होणाऱ्या टीकेला कोणत्या शब्दात प्रत्युत्तर द्यायचं हा प्रश्न अनेकदा त्यांच्या विरोधकांना पडतो. दरम्यान, आज एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांच्यासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी संजय राऊत यांना मानसोपचारांची आवश्यकता असून, त्यांनी एका चांगल्या रुग्णालयातून मानसोपचार घ्यावेत त्याचा खर्च सरकार करेल, असा टोला लगावला.
मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी नागपूरमध्ये दंगल घडवण्यात आली होती का, या संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या शंकेबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत यांनी आता स्वत:चा तपास करून घेण्याची आवश्यकता आहे. अनेक चांगली मनोरुग्णालये आता तयार झाली आहेत. आवश्यकता असेल तर त्याचा खर्च आम्ही सरकारच्यावतीने करू. अगदीच आवश्यकता भासली तर सिंगापूरचं रुग्णालय चांगलं आहे, असं मला कुणीतरी सांगितलंय. तिथे त्यांना पाठवायचं असेल तर त्याचाही खर्च सरकार देईल, हे मी आजच जाहीर करतो. गरज असेल तर बजेटमध्ये त्याची तरतूद करतो, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
दरम्यान, एबीपी माझा या वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापैकी तुमचे लाडके ठाकरे कोणते? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, "ठाकरे असे आहेत की, आपण त्यांना लाडकं म्हणायचं आणि त्यांनी आपल्याला दोडकं म्हणायचं. कुठे भानगडीत पडता?, असं विधानही त्यांनी केलं.