Sanjay Raut: 'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:25 AM2022-03-11T10:25:13+5:302022-03-11T13:55:47+5:30
Sanjay Raut: उत्तर प्रदेशासह चार राज्यात भाजपने मोठा विजय मिळवला. या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
मुंबई: काल(10 मार्च) उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यात मोठा विजय मिळवला. तर, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. भाजपच्या या विजयानंतर देशभरात भाजप कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आहेत. दरम्यान, या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
'पंजाबने विजयी होऊन दाखवा...'
आज मीडियाशी बोलताना संजय राऊत यांना कालच्या निकालावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेश आधीपासूनच भाजपचा होता. उत्तराखंड आणि गोव्यातही भाजपची मोठी ताकद होती, म्हणूनच तिथे त्यांना विजय मिळवता आला. पण, पंजाबसारख्या सेंसेटीव्ह राज्यात भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला विजय मिळवता आला नाही. पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा, ' असं राऊत म्हणाले.
'आम्हाला टोले मारता, तुमचं काय?'
उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले. त्यावरुन राऊतांना प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशात गोव्यात आम्हाला मोठा पाठिंबा नाही, त्यामुळे आम्ही जिंकलो नाही. आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे तुम्ही आम्हाला टोला मारता. पण, आमच्यापेक्षा तुमचे वाईट हाल पंजाबमध्ये झाले आहेत. पंजाबमधील नागरिकांनी तुम्हाला नाकारले, तिकडे तुमच्याही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही' असंही राऊत म्हणाले.
'मायावती आणि ओवेसींमुळे भाजप विजयी'
भाजपला मोठा विजय मिळाला आहे, पण यूपी त्यांचेच राज्य होते. भाजपच्या विजयात मायावती आणि ओवेसी यांचे योगदान आहे, या सर्वांना पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यायला पाहिजे. लोक कधी जिंकतात कधी हरतात, तुमच्या आनंदात आम्हीही आहोत. अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या, त्यांचेही अभिनंदन, असेही राऊत म्हणाले.
संबंधित बातमी- 'मुंबई महापालिकेवर भगवा फडणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत