मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता पुणे झाला आहे, असे म्हणून शिवसेना नेते संजय राऊत यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आरसा दाखवला आहे, असा टोला भाजप मीडिया पॅनलचे सदसत्य अवधूत वाघ यांनी लगावला आहे. एक ट्विट करत त्यांनी राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
"बाळासाहेब होते तेव्हा मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता (पवार साहेबांमुळे) तो पुणे झाला आहे... असं बोलून संजय राऊतांनी मा. मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला," असे ट्विट करत अवधुत वाघ यांनी, संजय राऊतांच्या पुण्यातील वक्तव्यावरून निशाणा साधला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत - राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. तेव्हा सरकारमधील जेष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करत आहेत. तिकडे मोदीही इतर राज्यांना मार्गदर्शन करत असतात. सल्ला देतात. शरद पवारांचा सल्ला घेतला नाही, तर आमच्यासारखे करंटे आम्हीच, असे राऊत म्हणाले होते.
राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आता पुणे - राज्याच्या राजकारणात पुणे नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत ते मुंबई होते. अनेक वर्ष देश आणि राज्य पातळीवरचे राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होते. आता बरेच प्रमुख राजकीय नेतेमंडळी पुण्यात आहेत,” असेही राऊत यावेळी म्हणाले होते.
कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही -महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. उत्तम राज्य कारभार चालण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये उत्तम संवाद असणे आवश्यक आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याचा अभाव जाणवत आहे. विरोधी पक्षाने आपले महत्व जाणून घेत १०५ एवढे संख्याबळ असताना समांतर सरकार चालवत आहोत, असा विचार करणे गरजेचे आहे. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही. आणि सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही,” अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.