"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2024 01:44 PM2024-03-09T13:44:55+5:302024-03-09T13:52:49+5:30

"कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे..."; वाचा कोणत्या मुद्द्यावर केलं भाष्य

Sanjay Raut slammed Eknath Shinde Ajit Pawar over seat allocation strategy by BJP in Lok Sabha Elections 2024 | "शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका

"शिंदे, अजितदादांना दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतात"; संजय राऊतांची बोचरी टीका

सध्या लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाराष्ट्रात रोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तशातच महायुतीमध्ये भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी एकेरी जागांवरच समाधान मानायला सांगत असल्याच्या बातम्या येत आहेत. या मुद्द्यावरून आज संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला. त्यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्ली भांडी घासावी लागतात, असे ते म्हणाले.

कुत्र्यापुढे हाडून फेकावं त्याप्रमाणे...

ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली म्हणतात त्यांना वेळोवेळी दिल्लीत जावे लागते. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना लोकसभेच्या जागांसाठी दिल्लीत जाऊन व्यापाऱ्यांची भांडी घासावी लागतात. डुप्लिकेट शिवसेनेची अशी अवस्था होणार हे निश्चित आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने अभिमानाने आतापर्यंत लोकसभेच्या २३ जागा लढल्या आहेत. यावेळीही लढणार आहोत. डुप्लिकेट शिवसेनेच्या वाट्याला ५ जागाही येत नाहीत. पाच जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडूक फेकावं त्याप्रमाणे फेकल्याची बातमी मी वाचतोय," अशी अतिशय बोचरी टीका संजय राऊतांनी शिंदे गटाबाबत बोलताना केली.

तुम्ही भांडत बसा त्यांची!

"अजित पवारांची दोन-चार जागांवरच बोळवण करतायत (असंही मी ऐकलं). डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये. यांचा अस्त जवळ आला आहे. व्यापाऱ्यांपुढे ते काय जोर लावणार, त्यांच्यात एवढी हिंमत आहे का? जोर लावून दाखवावा. आम्ही स्वाभिमानासाठी बाहेर पडलो. तुम्ही भांडत बसा त्यांची..", असा टोला त्यांनी लगावला.

आम्ही झुकणार नाही

"ईडीकडून आमदार रोहित पवार यांच्यावर जी कारवाई सुरू आहे, तशी अजित पवार यांच्यावर देखील झाली. परंतु त्यांनी गुडघे टेकले आणि ते भाजपमध्ये पळून गेले. प्रफुल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली. इकबाल मिरची यांच्याशी संबंध असल्याचे पुरावे ईडीने त्यांना दाखवले. त्यानंतर ते ही भाजपमध्ये गेले. मग त्यांचावरील कारवाई थांबली. पुढे हसन मुश्रीफ यांच्यावर अन् त्यानंतर अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळावरील कारवाई थांबली. पण अनिल देशमुख, रोहित पवार आणि मी तसेच अन्य काही लोक आहेत, जे झुकले नाहीत. कोणापुढे नतमस्तक झाले नाहीत. आम्ही स्वाभिमानी आहोत. आमच्यासारखे स्वाभिमानी लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तुमची महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची इच्छा पूर्ण होणार नाही," असा इशाराच त्यांनी दिला.

Web Title: Sanjay Raut slammed Eknath Shinde Ajit Pawar over seat allocation strategy by BJP in Lok Sabha Elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.