महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी "राजकारणात आल्यापासून मी कोणताही पक्ष बदललेला नाही. पहिल्या दिवसापासून राज्यातील जनता हाच माझा पक्ष राहिलेला आहे. मी पूर्वीही जनतेचाच होतो आणि आजही जनतेचाच आहे" असं विधान केलं आहे. यावरून संजय राऊत यांनी खोचक टोला लगावला आहे. "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला" असं म्हणत निशाणा साधला आहे.
"अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर पक्ष चोरला. आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे. त्यांनी सरळ सरळ केलेलं पक्षांतर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा महाराष्ट्रद्रोह उफाळला नसता तर बाळासाहेबांची शिवसेना धनुष्यबाणासह एकनाथ शिंदेंना मिळाली नसती. तेव्हा जरा जपून बोला. लोक ऐकत आहेत" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडिओत अजित पवार हे राज्यातील जनतेला भावनिक साद घालताना दिसत आहेत. तसेच, या व्हिडिओद्वारे राज्यातील अर्थसंकल्पातील विविध मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांनाही टोला लगावला आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
आज सकाळी अजित पवारांनी विशेष व्हिडीओ संदेश जारी करत विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात पाहिले तर अजित पवार अशाप्रकारे विशेष कॅमेरा सेटअप लावून व्हिडिओद्वारे माहिती देताना दिसून आले नाहीत. मात्र, रोखठोक आणि परखड बोलण्याची शैली असलेल्या अजित पवार यांनी अशाप्रकारे प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.