ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. तसेच "भाजपाला 60 मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?" असं म्हणत संजय राऊतांनी आव्हान दिलं आहे. "तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. मुख्यमंत्री त्यांना भेटत आहेत. महाराष्ट्र हे सर्व बघतोय. कोश्यारींना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच कायदेशीर मार्गाने मिळतील."
"शिवसेना तोडण्यासाठी, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी त्यांनी घटनेचा गैरवापर केला" असं म्हणत कोश्यारींवर टीका केली आहे. यासोबतच "मागच्या लोकसभेत शिवसेनेचे 19 खासदार होते. 18 महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्राबाहेर. आमचा लोकसभेतील 19 चा आकडा कायम राहील. कदाचित वाढेलही. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू. त्यात कुणाला त्रास होण्याचं कारण नाही. कदाचित त्यात वाढही होईल" असंही त्यांनी सांगितलं.
"मुंबई महापालिका निवडणूक घ्यायला का फाटते? तेवढच सांगा. घ्या निवडणुका पळ कशाला काढताय? न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक का ठेवत आहात? किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून का जावं लागलं हे सांगा. नाहीतर मी सांगेल भविष्यात. या विषयी खुलासा केला. न्यायालयाचा ज्या प्रकारे गैरवापर सुरू आहे. कायद्याचा गैरवापर सुरू आहे. न्यायालयाचा वापर सुरू आहे. अशा प्रकरणावर बोला. खुलासा करा" असं संजय राऊत म्हणाले.
"150 जागा जिंकणार आहात. मैदानात या, पळ कशाला काढता? कर्नाटकात 200 जागा जिंकणार होता. तशी भाषाही तुम्ही केली होती. कर्नाटक जिंकण्यासाठी सर्व फौज उतरवली. अख्खं मंत्रिमंडळ उतरवलं. फक्त राष्ट्रपतींना उतरवण्याचे बाकी होते. काय झालं कर्नाटकात? ते 150 ची भाषा करतात त्यांना 60 मध्ये ऑलआऊट करू" असं म्हणत भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महाविकास आघाडी जागा वाटपावर देखील भाष्य केलं.
"कोण लहान, कोण मोठा यासाठी एकदा सगळ्यांचे आम्ही डीएनए टेस्ट करू. मधल्या काळात शिवसेना-भाजप युतीमध्ये देखील कोण लहान भाऊ मोठा भाऊ? हा विषय आला होता. प्रत्येक जण आपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ही भूमिका मांडावी लागते. लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभेला वेळ आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.