२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्या बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे. तोवर त्या बँकांत जमा करता येतील. य़ाच दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि 40 आमदारांवर घणाघात केला आहे.
"५० खोके ज्यांना दिले त्यांच्याकडेच २ हजारांच्या नोटा आहेत. यामुळे ४० आमदार हैराण झाले असून फार मोठी धावपळ चाललीय" असं म्हणत राऊतांनी निशाणा साधला आहे. तसेच "ब्लॅकचा पैसा हा सध्याच्या महाराष्ट्रातल्या सरकारकडे आणि भाजपाकडे आहे" असंही म्हटलं आहे. "सामान्य माणसाकडे २००० च्या नोटा नाहीत. पहिली आणि दुसरीही नोटबंदी फसली. पंतप्रधान देशाशी खोटं बोलले. नोटबंदीच्या निर्णयामुळे साडेतीन ते चार हजार लोक बँकेच्या रांगांमध्ये मरण पावले. हा सदोष मनुष्यवध आहे. याचं प्रायश्चित घेणार आहात का?" असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
"५०-५० खोके दिलेत त्यात दोन हजाराच्याच सगळ्या नोटा आहेत. त्यामुळे त्यांचच नुकसान आहे. ते आता मुख्यमंत्र्यांकडे नोटा बदलून मागताहेत. ब्लॅकचा पैसा हा सध्याच्या महाराष्ट्रातल्या सरकारकडे आणि भाजपाकडे पडलेला आहे. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्यांच्या खिशात दोन हजाराची नोट नाही आहे. ४० आमदार हैराण आहे. आता त्या खोक्यांचं करायचं काय? धावपळ चालली आहे फार मोठी" असं म्हणत संजय राऊत यांनी ४० आमदारांवर टीका केली आहे.
"भाजपाला 60 मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?"
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपा आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भगतसिंह कोश्यारींवर निशाणा साधला आहे. तसेच "भाजपाला ६० मध्ये ऑलआऊट करू; मैदानात या, पळ कशाला काढता?" असं म्हणत संजय राऊतांनी आव्हान दिलं आहे. "तेव्हाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. मुख्यमंत्री त्यांना भेटत आहेत. महाराष्ट्र हे सर्व बघतोय. कोश्यारींना त्यांच्या कृत्याची फळं लवकरच कायदेशीर मार्गाने मिळतील."
"शिवसेना तोडण्यासाठी, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून काढण्यासाठी त्यांनी घटनेचा गैरवापर केला" असं म्हणत कोश्यारींवर टीका केली आहे. यासोबतच "मागच्या लोकसभेत शिवसेनेचे १९ खासदार होते. १८ महाराष्ट्रात आणि एक महाराष्ट्राबाहेर. आमचा लोकसभेतील १९ चा आकडा कायम राहील. कदाचित वाढेलही. ज्या जागा आम्ही जिंकल्या त्या कोणत्याही पद्धतीने कायम ठेवू. त्यात कुणाला त्रास होण्याचं कारण नाही. कदाचित त्यात वाढही होईल" असंही त्यांनी सांगितलं.