विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हाच मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिला. या निकालामुळे शिंदे यांच्या गोटात आनंदाचं वातावरण असून या निकालाचा आधार घेत एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार टीका केली. "निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिलं आहे," अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेनंतर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. "श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचा मुलगा नाही का?" असं म्हटलं आहे. तसेच शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले असं म्हणत हल्लाबोल केला आहे. "एकनाथ शिंदे घराणेशाहीचा अंत झाल्याचं म्हणतात मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का?, सिद्ध करा नाही म्हणून, श्रीकांत शिंदेंसाठी मुलगा म्हणूनच मत मागितलं ना."
"बाळासाहेब ठाकरे यांची घराणेशाही कधीच नव्हती. शरद पवारांची घराणेशाही कधीच नव्हती, यशवंतराव चव्हाणांची घराणेशाही कधीच नव्हती. विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारा एक मार्ग असतो. एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीचे पुरस्कर्ते आहेत. शिवसेनेला इतिहासात जमा करणारे स्वतः गाडले गेले" असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
"राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केले. ते शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकीली करावी असे ते निकालपत्राचे वाचन करत होते. प्रत्येक कागदपत्र त्यांच्यासमोर ठेवलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की भरत गोगावले यांची केलेली निवड चुकीची आहे. आम्ही निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयात जाऊ. कालच्या निर्णयानंतर प्रश्न निर्माण झाले आहे. निर्णय खरा की खोटा हे त्यांनी स्वतःला विचारावं" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.