अकोला जिल्ह्यातील बाळापुर मतदार संघात खारपानपट्ट्यात समाविष्ट होणाऱ्या 69 गावांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी मोर्चा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुख Nitin Deshmukh यांना नागपूर पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 69 गावातील पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठविण्यासाठी नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी मोर्चा काढला होता.
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचण्यापूर्वी नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक केली. याच दरम्यान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली. सरकार जनतेलाच घाबरू लागले!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली. सरकार जनतेलाच घाबरू लागले!" असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"