Sanjay Raut vs PM Modi: मुंबईत सोमवारी संध्याकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. घाटकोपर भागातील एक मोठे होर्डिंग कोसळून त्यात सुमारे १७ जणांचा मृत्यू झाला. होर्डिंग एका पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली दबून अनेक जण जखमी झाले. गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या दुर्दैवी घटनेबाबत राजकीय स्तरावर अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना दिसले. तशातच बुधवारी संध्याकाळी घाटकोपरमध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक रोड शो झाला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड शो आयोजित केला गेला होता. या मुद्द्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले.
"देशाच्या PM च्या रोड शो साठी दुपारी १२ पासून मुंबईचे रस्ते, मेट्रो, कार्यालये बंद केली. लोकांचे हाल झाले. निवडणूक आयोग आहे कुठे? आचारसंहिता आहे कुठे? अशा प्रकारचा प्रचार या देशात कधीही झाला नव्हता. एका व्यक्तीने प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून रस्ते बंद करण्यात आले, लोकांची गैरसोय करण्यात आली. जिथे होर्डिंग कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला तेथे पंतप्रधान रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही," असे राऊत म्हणाले. "महाराष्ट्रात नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. ४ जूननंतर देशात आणि महाराष्ट्रात भाजपाचे अस्तित्व राहिल की नाही या आमच्यापुढला प्रश्न आहे. पण विरोधी पक्ष म्हणून भाजपाला सन्मानाचे स्थान मिळाले अशी आमची भूमिका आहे," असा टोलाही राऊतांनी लगावला.
"घटनाबाह्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रचार करत आहेत. दोन घटनाबाह्य पक्ष बरखास्त व्हायला हवे होते तेच सध्या प्रचारात दिसतायत. घटनेचे आणि संविधानाचे रक्षण करण्याचे कार्य असणारे निवडणूक आयोग तारखांवर तारखा देत आहे हे आश्चर्यकारक आहे. म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई लोकसभा निवडणूक आम्ही लढत आहोत. घटनाबाह्य सरकारला जाहीरनाम्याची गरज नाही. पैसा फेको, तमाशा देखो हाच महायुतीचा जाहीरनामा आहे," अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली.