सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "लोकशाहीचा जय झाला आहे, मग हुकूमशाहीच्या चेहऱ्यावर हास्य कसले?" असा सवाल केला आहे. तसेच "महाराष्ट्रातील घटनाबाहय़ सरकार हा देशाच्या घटनेला लागलेला डाग आहे. राज्यघटनेची अंमलबजावणी आज चुकीचे लोक करीत असल्याने देशात भयाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. सामनाच्या रोखठोकमधून त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"लोकशाही खिशात घालून कुणाला फिरता येणार नाही. 16 आमदारांना अपात्र ठरवावेच लागेल हे पहिले व शिवसेनेसह धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच येईल हे दुसरे. महाराष्ट्राच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आशेची किरणे दाखवणारा आहे. सरकार स्थापन करताना शिंदे-फडणवीसांनी घेतलेले सर्व निर्णय बेकायदेशीर ठरवूनही सरकार सत्तेवर आहे. लोकशाहीचा विजय झाला हे खरे, पण सत्तापदावर बसलेले लोक घटनेचे गारदी म्हणून काम करीत आहेत. राज्यघटनेची अंमलबजावणी चुकीच्या हातात आहे" असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
रोखठोकमध्ये नेमकं म्हटलंय काय?
- महाराष्ट्रातील घटनाबाहय़ सरकार हा देशाच्या घटनेला लागलेला डाग आहे. हा डाग धुऊन काढणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, पण काही घटना तज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सोयीचा अर्थ काढून महाराष्ट्राचे सत्ताधारी अंमलबजावणी करतील. विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीच्या मुलाखती देऊन वातावरण निर्मिती करीत आहेत तो सर्वच प्रकार सर्वोच्च न्यायालयास आव्हान देणारा वाटतो.
- राज्यघटनेची अंमलबजावणी आज चुकीचे लोक करीत असल्याने देशात भयाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रकरणात न्या. चंद्रचूड यांच्या पाच सदस्य खंडपीठाने सांगितले, “उद्धव ठाकरे यांनी स्वखुशीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अन्यथा त्यांची पुन्हा त्याच पदावर पुनर्स्थापना करणे सोपे झाले असते.” या एका ओळीतच संपूर्ण निकालपत्राचे सार सामावले आहे.
- ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा दिला नसता तर आज ते पुन्हा मुख्यमंत्री असते. तरीही मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस निकालाच्या दिवशी हसत हसत मीडियासमोर आले व म्हणाले, “पहा, न्यायालयाने आमच्याच बाजूने निकाल दिला, आम्ही जिंकलो!” त्या दिवशी शिंदे-फडणवीस हे एकमेकांचे अभिनंदन करीत होते. पेढे भरवीत होते. याचा अर्थ न्यायालयाचा निकाल समजूनही ते वेडाचे सोंग घेऊन पेडगावला निघाले आहेत.
- “सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना अपात्र का ठरवले नाही?” आमदारांचे हे प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे का पाठवले? असा प्रश्न विचारला जात आहे. सदस्यांच्या अपात्रतेबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे घटनेनेच विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. फक्त राज्यघटनेचा आदर ठेवून सदसद्विवेकबुद्धी जाग्यावर ठेवून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने काय केले, हे विचारणे गैर.
- आता सुप्रीम कोर्टाने काय केले ते समजून घ्या. सुप्रीम कोर्टापुढे 11 प्रश्न होते. त्यातील दोन प्रश्न विचारासाठी सात सदस्यांच्या खंडपीठापुढे पाठवले. उरलेल्या 9 प्रश्नांवर सुप्रीम कोर्टाने निकाल दिला व तो शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात आहे. तरीही शिंदे-फडणवीस सांगतात, सुप्रीम कोर्टाने आमचेच सरकार कायदेशीर ठरवले. हे गोंधळलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
- भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात लोकशाही व घटनेच्या चिरफळय़ाच उडवल्या. बहुमत असलेल्या कॅबिनेटने राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद सदस्यांची यादी राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवली. राज्यपालांनी त्यावर शेवटपर्यंत निर्णय घेतला नाही. राज्यपालांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. हा पुढील कारस्थानाचा पाया ठरला. आता पेढे वाटणाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचे काही मुद्दे देतो.
- निवडणुकीचे चिन्ह हे राजकीय पक्षाला दिले जाते. कोणत्याही विधिमंडळ पक्षाला नाही. त्यामुळे पक्षात फूट पडली म्हणून विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर चिन्ह आमचे हा शिंदे गटाचा दावा संपला आहे. हे इतके फटके बसूनही ‘विजय आमचाच झाला. लोकशाही जिंकली’ असे बोलणे व नाचणे हा विनोद आहे. लोकशाहीचा विजय नक्कीच झाला. सर्वोच्च न्यायालयाने राजकीय दाबदबावांना बळी न पडता निर्णय दिला व लोकशाहीची प्रतिष्ठा राखली.
- लोकशाही खिशात घालून कुणाला फिरता येणार नाही. 16 आमदारांना अपात्र ठरवावेच लागेल हे पहिले व शिवसेनेसह धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडेच येईल हे दुसरे. निकाल हा असाच आहे. त्यामुळे जिंकले कोण? सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांकडे पाठवलेला निकाल ‘ईव्हीएम’चे बटन दाबल्याप्रमाणे बदलता येणार नाही.
- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीत श्री. कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. युक्तिवादाचा शेवट करताना ते म्हणाले, “हा खटला मी जिंकेन की हरेन याची चिंता मला नाही, पण देशात लोकशाही, स्वातंत्र्य, राज्यघटना शिल्लक राहील काय? हा प्रश्न आहे. मी त्यासाठीच लढलो!” लोकशाहीचा जय झाला आहे, मग हुकूमशाहीच्या चेहऱ्यावर हास्य कसले?