संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना, हे शिंदेंचं जे प्रकरण आहे ते काही दिवसात बंद होईल" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. तसेच "आपला पक्ष, जो गट आहे, तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी-शाहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत" असंही म्हटलं आहे.
"हा एक हास्यास्पद प्रकार आहे. हिंदहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ५८ वर्षांपूर्वी शिवसेनेचा पाया रचला. ५८ वर्षांपासून बाळासाहेबांची ही शिवसेना मुंबईसह महाराष्ट्रात आणि दिल्लीत निरंतर काम करत आहे. तेव्हापासून आमच्यासारख्या लाखो लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांचा भगवा झेंडा खांद्यावर घेतला. तो कोणी खाली ठेवला नाही."
"आम्ही अनेक संकटांना सामोरे गेलो, अनेकांचं बलिदान झालं. अनेक शिवसैनिकांनी तुरूंगवास भोगला. पण आम्ही पक्षाशी ईमान कायम ठेवलं. म्हणून आजही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्याच जोमाने काम करत आहे, ठामपणे उभी आहे" असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"पण कोणी म्हणत असेल की आमचीच शिवसेना खरी तर त्यांनी स्वत:ला आरशात पाहावं. बाळासाहेबांच्या शिवसेनेत ते कुठे होते, याचा त्यांनी विचार करावा. पैशांनी मतं विकत घेणार, वायकरांसारख्या विजयाची चोरी करणं याला जनाधार म्हणत नाहीत आणि आपला पक्ष, जो गट आहे, तो महाराष्ट्राशी दुश्मनी करणाऱ्या मोदी-शहांच्या चरणांशी ठेवणं याला जनाधार, विचारधारा म्हणत नाहीत"
"लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना, हे शिंदेंचं जे प्रकरण आहे ते काही दिवसात बंद होईल. आमचा उद्या मोठा कार्यक्रम असणार आहे आणि उद्धव ठाकरे तिथे मार्गदर्शन करणार आहेत" असं म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.