Sanjay Raut: 'मुंबई महापालिकेवर भगवा फडकणार, त्या निवडणुकांचा इथे संबंध नाही'-संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 10:27 AM2022-03-11T10:27:57+5:302022-03-11T13:35:59+5:30
Sanjay Raut: 'त्या निवडणुकांचा इथे काहीही परिणाम होणार नाही, मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार'
मुंबई: काल(10 मार्च) उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत भाजपने चार राज्यात मोठा विजय मिळवला. तर, पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. दरम्यान, या निकालावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
'मुंबई पालिकेवर आमचीच सत्ता येणार'
या पाच राज्यांचा येणाऱ्या पालिका निवडणुकीवर परिणाम होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला असता, राऊत म्हणाले की, 'या राज्यांचा आणि मुंबई पालिकाचा काहीही संबंध नाही. गेल्यावेळेस पश्चिम बंगाल निवडणुकांच्या वेळेसही असेच बोलत होते. पण, त्याचा इथे काहीही परिणाम होणार नाही. मुंबई महापालिकेवर आमची सत्ता होती आणि पुढेही राहणार.'
'माझ्या घरावर धाडी टाका, मी घाबरत नाही'
राऊत पुढे म्हणाले की, 'काल शरद पवार साहेब होते, आम्ही तयार आहोत. आज मीही बोलतोय, जे करायचे ते करा. हे काय करतील, अजून रेड टाकतील, गुन्हे दाखल करतील. यांना दुसरं काही येत नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचा चुकीच्या पद्दतीने वापर केला जातोय. एकाच आघाडीचे लोक टार्गेट केले जातायत. तपास यंत्रणेवर राजकीय तबाव आणला जातोय. राजकीय कारणांसाठीच आमच्यावर हल्ले होताहेत. मी हे आता बोलतोय, दहा मिनिटांनी माझ्या घरावर धाड पडू शकते. पण, त्यांनी धाडी टाकाव्यात, मी कुणालाही घाबरत नाही,' असा इशाराही राऊतांनी दिला.
'पंजाबमध्ये भाजपचे वाईट हाल'
उत्तर प्रदेश आणि गोवा राज्यात शिवसेनेच्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतदान झाले. त्यावरुन राऊतांना प्रश्न विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, 'उत्तर प्रदेशात आम्हाला मोठा पाठिंबा नाही, आमच्या उमेदवाराला कमी मतदान झाल्यामुळे तुम्ही आम्हाला टोला मारता. पण, आमच्यापेक्षा तुमचे वाईट हाल पंजाबमध्ये झाले आहेत. तिकडे तुमच्याही उमेदवारांना विजय मिळवता आला नाही,' असंही राऊत म्हणाले.
संबंधित बातमी- 'पंजाबमध्ये विजयी होऊन दाखवा...', संजय राऊत यांचे भाजपला आवाहन