Neelam Gorhe on Sanjay Raut: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काही दिवसांपूर्वी मोठा धक्का बसला. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ठाकरे गटातील महिला आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनीदेखील मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला. याबाबत नीलम गोऱ्हेंनी भूमिका मांडली. त्याच वेळी त्यांनी संजय राऊतांबाबत वेगळे विधान केले.
"संजय राऊतांनी मला कायम मदत केली आहे. त्यांनी मला आमदारकीच्या वेळीही सहकार्य केले. माझ्यासाठी शब्द टाकला. त्यामुळे त्यांच्याबद्दल मी फारसं बोलत नाही. पण त्यांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलायचे झाल्यास, शिवसेनेचा प्रत्येक प्रवक्ता ज्यावेळी काही बोलतो तेव्हा त्याला पक्षाकडून जे सांगितले जाते तेच तो बोलत असतो. त्यामुळे आक्रमकपणे भूमिका मांडणारा नेता म्हणून संजय राऊतांकडे ती भूमिका आली होती. त्याच्यामुळे संजय राऊतांना खूप त्रास झाला. मला वैयक्तिकदृष्ट्या असं वाटतं की संजय राऊतांचा यात कारण नसताना बळी गेला", अशा शब्दांत नुकत्याच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी संजय राऊतांबद्दलची बाजू मांडली.
एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट संजय राऊतांवर तोफ डागत असतानाच नीलम गोऱ्हेंनी त्यांची बाजू मांडली, पण त्यासोबतच राऊतांचे काय चुकले? ते देखील सांगितले. "प्रत्येक प्रवक्त्याचं काय कौशल्य आहे ते त्याच्यावर अवलंबून असतं. एखादी गोष्ट पक्षाने सांगितली तरी ती कशा भाषेत बोलायची हे त्या प्रवक्त्याने ठरवायला हवे. ते आक्रमक बोलतात म्हणून त्यांच्यावर नक्कीच टीका केली जाऊ शकते. लोकं आक्षेप घेऊच शकतात. पण ते जे काही बोलतात ते पक्षाने सांगितलेलंच असतं. त्यामुळे त्यांचा बळी गेला असं म्हणता येऊ शकतं," असं गोऱ्हे म्हणाल्या.