मुंबई: पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 11 हजार कोटींचा घोटाळा करून फरार झालेला उद्योगपती नीरव मोदीमुळे सत्ताधारी भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याची माहिती उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर मेसेजेस् फिरायला सुरूवात झाली होती. नीरव मोदी हा घोटाळा उघड होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत दाव्होस येथील जागतिक आर्थिक परिषदेला हजर होता. त्यामुळे विरोधकांकडून नीरव मोदी आणि पंतप्रधान यांच्यातील कनेक्शनकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये भाजपाशी 36 चा आकडा असणारी शिवसेनाही मागे नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करून मोदींना खोचक टोला हाणलाय. पैसे बँक मे रखो तो; नीरव मोदी का डर.. घर मे रखो तो नरेंद्र मोदी का.., असे राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मध्ये या घोटाळ्यामुळे मोदी सरकारच्या 'डिजिटल इंडिया'च्या मर्यादा समोर आल्याचे म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेचे कठोर नियम आणि बँकांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या डोळ्य़ात धूळ फेकण्यात घोटाळेबाज कसे यशस्वी होतात? तुमच्या त्या ‘डिजिटल’ प्रणालीमुळे घोटाळय़ांना आळा बसण्याचे दावेही पोकळ कसे ठरतात?'', असा टोलादेखील उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारला हाणला.
पैसे बँक मे रखो तो; नीरव मोदी का डर.. घर मे रखो तो नरेंद्र मोदी का..- संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 10:33 AM