मुंबई : वाईन विक्रीतून मिळणारा महसूल वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाईन विक्रीच्या नव्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली आहे. मात्र, या निर्णयाला विरोध करत भाजपाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. परंतू, राज्य सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत. यातच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही यावरून भाजपावर हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शनिवारी भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. यावेळी त्यांनी तत्कालीन फडणवीस सरकारच्या धोरणाची आठवण करून देत भाजपावर टीका केली आहे. फडणवीस सरकारने दारूची होम डिलिव्हरी ऑनलाइन करण्याचे धोरण आखले होते, ते काय होते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच, भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, दारू हे औषध आहे आणि ते कमी प्रमाणात प्या, असे सांगत संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला आहे. परंतु सर्वच दुकानांमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी नाही. ज्या सुपरमार्केटचे आकारमान १ हजारपेक्षा जास्त आहे. अशा सुपरमार्केट आणि वॉक इन स्टोअरमध्ये वाईनची विक्री करण्यास राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही - देवेंद्र फडणवीस सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्याची परवानगी दिल्यामुळे भाजपा नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राल मद्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी देण्यात आली आहे, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू अशी टीका करत महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.