नाशिक-
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीत नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. पण नितेश राणे नेमके आहेत कुठे याबाबत अद्याप काहीच कळू शकलेलं नाही. त्यांचा फोन देखील बंद लागत आहे. त्यामुळे अज्ञातवासात गेलेले नितेश राणे समोर का येत नाहीत असा सवाल उपस्थित केला जात असताना आता केंद्रीय मंत्री आणि नितेश यांचे वडील नारायण राणे यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. याच प्रकरणाबाबत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक सूचक विधान केलं आहे.
"काय माहित एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं त्यांना लपवलं असेल तर...", असं विधान संजय राऊत यांनी केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांच्या या विधानाचा रोख नेमका कुणाकडे होता? असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?"केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये कारण गुन्हेगाराला पाठिशी घालणं हा देखील एक गुन्हा आहे. पुत्र असो किंवा इतर कुणी राणेंनी पोलिसांना माहिती द्यावी आणि सहकार्य करावं. काय माहित एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यानं त्यांना लपवलं असेल... मी कुणाचं नाव घेणार नाही. काही सांगता येत नाही", असं म्हणत संजय राऊत यांनी कुणाचंही नाव घेणं टाळलं. पण त्यांच्या सूचक वक्तव्यानं त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
नोटीस राष्ट्रपतींनाही येतात पोलिसांनी चौकशीसाठी नारायण राणे यांच्या घराबाहेरही नोटीस लावल्याबाबत विचारलं असता संजय राऊत यांनी हे अतिशय किरकोळ असल्याचं नमूद केलं. देशाच्या राष्ट्रपतींनाही सुप्रीम कोर्टाच्या नोटीसा येतात. त्यात काही चुकीचं नाही. त्यांना पोलिसांच्या नोटीसीला सामोरं जावून सहकार्य करायला हवं, असं राऊत म्हणाले.