महाराष्ट्र, प. बंगालमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचे काम सुरु आहे. तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका नाहीतर आम्ही तुमचे सरकार घालवू अशा धमक्या दिल्या जातायत. भाजपाचे नेते महाराष्ट्रात १७० एवढ्या बहुमताचे सरकार असूनही दर दोन दिवसांनी आता हे सरकार जाईल, उद्या जाईल असे वक्तव्य करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. राष्ट्रपती राजवट आणायची आहे. हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार हाताशी लागले आहेत. जर तुम्ही बधला नाहीत तर केंद्रीय यंत्रणा तुमच्या लोकांना टाईट करण्यासाठी तयार आहेत. यावर मी म्हणालो, हरकत नाही तुम्ही काहीही करू शकता, असे मी त्यांना म्हणालो, असे राऊत यांनी सांगितले.
सध्या पवार कुटुंबावर भारी पडतायत, त्यांनाही आम्ही टाईट करणार आहोत. शरद पवारांच्या नातेवाईकांच्या घरांवर धाडी पडू लागल्या. मी तेव्हा त्यांना नाही म्हणालो, तेव्हा त्याच्या तिसऱ्या दिवशी पहाटे चार वाजल्यापासून माझ्या नातेवाईकांवर धाडी पडू लागल्या. याच्या आधी मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन आता संजय राऊतांना अटक होणार, इथे धाड पडणार, असे सांगत होता. तुम्ही काहीही करा, हे सरकार पडणार नाही असे जेव्हा जेव्हा मी त्यांना सांगितले तेव्हा माझ्या नातेवाईकांवर, मित्रांवर धाडी पडू लागल्या. गेल्या काही वर्षांपासून भाजपाने नालायक पणा सुरु केला आहे. आम्ही कधी उत्तर दिले नव्हते. आता लोकांसमोर सत्य समोर येऊद्या, मग आपण पाहू असे उद्धव ठाकरेंचे आदेश असल्याचे राऊत यांनी सांगितले.
आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेणार होतो. परंतू आमची चर्चा झाली आधी इथून सुरवात करू आणि शेवट तिथे करू. दलाल म्हणाला ठाकरे कुटुंबाने कोराईला १९ बंगले बांधून ठेवलेत, असा आरोप केला होता. त्याला माझे आव्हान आहे, आपण चार बसेस करू तिथे पिकनिक करू. तिथे तुम्हाला बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, नाही दिसले तर त्याला जोड्याने मारायचे. जाऊ तिथे पार्टी करू. मराठी भाषा सक्तीची असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो, त्याच्याकडून ही अपेक्षा का करता, असा सवाल त्यांनी भाजपाला केला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊ म्हणता मग याचे आधी तोंड बंद करा, असेही राऊत म्हणाले.
पाटणकरांनी देवस्थानाची जमिन कुठे आणि कशी विकत घेतली हे त्यांनी दाखवावे, ही जमिन बाराव्या माणसाकडून पाटणकरांनी खरेदी केली. या बारा जणांची नावे राऊत यांनी सांगितली. देवस्थानाकडून आम्ही कशाकरता जमिनी खरेदी करू? असा सवालही त्यांनी केला आहे.