उद्या भाजपाचे साडेतीन नेते आत जातील असा इशारा देत संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. हे साडेतीन नेते कोण असा सवाल राज्यातील लोकांना पडलेला असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटच्या क्षणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे.
फडणवीस यांचा एक फ्रंटमॅन आहे, मोहित कंबोज, असा आरोप संजय राऊत यांनी करताना या कंबोज यांनी पीएमसी बँकेतील घोटाळ्याचे पैसे जमिनी खरेदी, प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्याचे म्हटले आहे. तसेच हा कंबोज एकदिवस देवेंद्र फडणवीसांना बुडविणार असल्याचा गौप्यस्फोटही केला आहे.
मोहित कंबोज यांनी १२ हजार कोटींची जमीन केवळ १०० कोटींना विकत घेतली आहे. त्या जमिनीवर त्याचा प्रकल्प सुरु आहे. यात पीएनबीचे पैसे गुंतलेले आहेत. ही जमिन एवढ्या कमी पैशांना कशी मिळाली याचा इतिहास मी तुम्हाला देणार आहे. किती कंपन्या स्थापन केल्या, त्याची माहिती देणार आहे. हे कसे झाले हे देवेंद्र फडणवीसांना चांगले माहिती आहे. त्यांनीच याचे उत्तर द्यावे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले त्यांना मी ओळखतो. त्यांनी मला वारंवार या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे सांगण्याचा प्रयत्न केला. आमची पूर्ण तयारी झालेली आहे. राष्ट्रपती राजवट आणायची आहे. हे सरकार घालवायचे आहे. काही आमदार हाताशी लागले आहेत. जर तुम्ही बधला नाहीत तर केंद्रीय यंत्रणा तुमच्या लोकांना टाईट करण्यासाठी तयार आहेत. यावर मी म्हणालो, हरकत नाही तुम्ही काहीही करू शकता, असे मी त्यांना म्हणालो, असे राऊत यांनी सांगितले. त्यानंतर तीन दिवसांत माझ्या नातेवाईक, मित्रांवर ईडीच्या धाडी पडू लागल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.