Sanjay Raut vs Chandrashekhar Bawankule : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असून ते परदेशात एका कॅसिनोत बसलेले दिसते. राऊतांनी त्यांचा एकट्याचा एक फोटो ट्विट केला. त्यासोबतच्या कॅप्शनमध्ये राऊतांनी कुठेही चंद्रशेखर बावनकुळेंचा उल्लेख केला नव्हता. पण भाजपाने या फोटोला प्रत्युत्तर म्हणून बावनकुळे यांचा सहकुटुंब परदेशातील पर्यटनाचा फोटो पोस्ट केला. त्यावर कालच्या दिवसभरात बरेच आरोप प्रत्यारोप झाले. त्यातच संजय राऊतांनी आणखी एक फोटो पोस्ट करून भाजपाला पुन्हा डिवचले.
"महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पाहा, ते तेच आहेत ना?" असा सवाल राऊत यांनी विचारला होता. या पोस्टवरून वेगवेगळ्या नेतेमंडळींनी प्रतिक्रिया दिल्या. त्यावर आज संजय राऊतांनी पुन्हा पोस्ट केली. "माझ्या पोस्ट मध्ये मी कुणाचंही नाव घेतलं होतं का? कुणावर काही आरोप केले होते का? मी फक्त म्हटलं होतं की, महाराष्ट्र जळत असताना हे महाशय मकाऊ मध्ये जुगार खेळत आहेत. पण भाजपा इथे हिट विकेट झाली आणि त्यांनी स्वत:च सांगितले की फोटोतील व्यक्ती त्यांचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अशा वागण्याला हिंदीत एक म्हण आहे की- आ बैल मुझे मार"
कालही भाजपच्या विविध नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बावनकुळेंच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केल्यानंतर, 'जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल' असं म्हणत संजय राऊत यांनी आपण आरोपावर ठाम असल्याचे सांगितले होते. "भाजपवाले म्हणतात की, ते फॅमिलीसह मकाऊला गेले आहेत...जाऊ द्या...पण त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे, कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल. झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय?" असा खरपूस सवाल संजय राऊत यांनी केला होते.