देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातील राजकीय नातं साऱ्यांनाच माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि त्यानंतर घडलेल्या विविध घटना यांचा राज्याच्या राजकारणावर खूप परिणाम झाल्याचे दिसत आहे. जून महिन्याच्या अखेरीस अचानक शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि त्यानंतर भाजपासोबत त्यांनी सत्तास्थापना केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गटाने भाजपावर पक्ष फोडल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आज संजय राऊतांनीदेवेंद्र फडणवीसांवर खोक्याखाली दबल्याची टीका केली.
"मी नसताना सामनामध्ये पोलीस घुसले आणि त्यांनी माझ्या कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेतले. त्यावेळी मी नाशिकला गेलो होतो. मी नसताना पोलिसांनी तपासाच्या नावाखाली सामना कार्यालयात घुसून आणि दहशत निर्माण करणे आणि हवे तसे कागद आधीच प्रिंट करून घेणे हे प्रकार झालेले आहेत. नरेश मस्के यांना जो जबाब मिळाला त्याच्यावर सही आहे का हे चेक करावे. पोलीस आयुक्तांना मी परत पत्र लिहीत आहे की पोलिसांनी कार्यालयात येऊन काय केलं. पण यावर मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही दाद मागणार नाही. कारण ते स्वत:देखील खोक्याखाली चिरडून काम करत आहेत. जे ४० खोके त्यांच्या अंगावर पडले आहेत, त्याखाली चिरडल्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे," अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.
‘तुम्ही बंडखोरीच्या विचारात आहात का? तुमच्या मनात काय आहे’, असे आपल्या वडिलांनी (उद्धव ठाकरे) बंडाच्या एक महिनाआधीच एकनाथ शिंदे यांना विचारले होते’, असा गौप्यस्फोट माजी मंत्री, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकमत डिजिटल क्रिएटर्स अवॉर्ड’ वितरण समारंभात येथे केला. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिले. "आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याशी चर्चा केली होती. मी कुठल्याही परिस्थितीत पक्ष सोडणार नाही असे ते म्हणाले होते. त्यांच्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती मतभेद असतात वाद असतात. त्यांनी कोणाच्या दबावाखाली हे केलं, त्यांच्यावर कोणत्या महाशक्तीचा दबाव होता हे आता साऱ्यांनाच समजलं आहे", असे राऊतांनी सांगितले.