Eknath Shinde vs Sanjay Raut, Shivsena Revolt: शिवसेनेतून बंडाचा झेंडा हाती घेतलेले एकनाथ शिंदे गट विरूद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असल्याचे दिसून येत आहे. सुरूवातीला शिंदे गटाकडे केवळ १५ आमदार होते, पण कालांतराने शिंदे गटातील आमदारांची संख्या अंदाजे ३८ झाली असून काही अपक्ष आमदारांचीही त्यांना साथ लाभल्याचे दिसत आहे. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटीमधील एका हॉटेलात वास्तव्यास असून त्यांची बाजू शिंदे गटातील दीपक केसरकर यांनी मांडली. या नंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल मोठं विधान केलं.
"अडीच वर्षांपासून एकनाथ शिंदे आणि इतर आमदार, मंत्री सरकारमध्ये काम करत आहेत. भाजपासोबत आमचे सरकार होते त्यावेळी भरसभेत एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला होता. भाजपा आमची कोंडी करत आहेत असं सांगत एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला होता. पण आता एकनाथ शिंदे यांनी या रामलीलामधून, नाटकातून बाहेर पडलं पाहिजे. त्यांनी मुंबईत, महाराष्ट्रात येऊन सांगावं की त्यांना काय हवंय. त्यांना जर सांगितलं ना की त्यांना मुख्यमंत्री करतो तर टनाटन उड्या मारत येतील", असं विधान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबद्दल बोलताना केले. 'शिंदे गटाला हिंदुत्व हवं आहे, त्याचा शिवसेना विचार करणार का?' या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत असं म्हणाले.
"एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व नेतेमंडळींचा डीएनए मला माहिती आहे. पण महत्त्वाकांक्षा मोठी गोष्ट असते. त्यामुळे हे केव्हा ना केव्हा होईल याची कल्पना होतीच. भाजपासोबत जाणाऱ्या लोकांना किंवा एकनाथ शिंदे यांना तेथे गेल्यावर मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का? तसं असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्यांना जर उपमुख्यमंत्री पदावरच समाधान मानायचं असेल तर ते त्यांना या सरकारमध्येही मिळूच शकतं. त्यामुळे ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, आपण नवीन लोकांना संधी देऊ आणि निवडून आणू", अशा शब्दांत राऊतांनी शिंदे गटावर शेलक्या शब्दांत टीका केली.