Sanjay Raut vs Modi, Rahul Gandhi Bharat Jodo: राहुल गांधी सध्या भारत जोडा यात्रेचा दुसरा टप्पा म्हणजेच, भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून देशभरात प्रवास करत आहेत आणि विविध राज्यातील लोकांशी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींची ही यात्रा काँग्रेसला नवी उभारी देईल आणि विरोधकांची इंडिया आघाडी अधिक भक्कम होईल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. तशातच सध्या राहुल यांची ही यात्रा महाराष्ट्रात आहे. या यात्रेतील आजच्या दिवशी नाशिकमध्ये भव्य सभा घेण्यात आली. या वेळी राज्यातील महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली. यावेळेस बोलताना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले.
"भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधी शेतकऱ्याची, जनतेची बात ऐकत आहेत. पण काही लोक फक्त 'मन की बात'च करतात. या यात्रेमुळे देश जोडण्याचे, लोकांना जोडण्याचे काम केले आहे. चांदवड ही कांदा नगरी आहे पण या कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. भाजपाच्या राज्यात गद्दार आमदार खासदारांना ५०-५० कोटी रुपयांचा भाव मिळतो पण कांद्याला भाव मिळत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी जय जवान व जय किसानचा नारा दिला होता पण आज भाजपा राज्यात शेतकरी व जवान दोघेही मरत आहेत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी राहुल गांधी यात्रा काढत आहेत. या यात्रेने एक गॅरंटी तर पक्की केली आहे आणि ती म्हणजे ‘मोदी तो गयो", अशा शब्दांत संजय राऊतांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, मोदी सरकार पुन्हा जिंकून येणार नाही, असा विश्वासही व्यक्त केला.
राहुल गांधी काय म्हणाले?
"देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल. आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लावलेला आहे त्याचा काँग्रेस सरकार विचार करुन शेततकऱ्यांना जीएसटीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. मुठभर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे व काँग्रेस सरकार ते करेल. सीमेवरील जवान व शेतकरी यांच्याशिवाय देश चालू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचे आवाज ऐकणारे काँग्रेसचे सरकार असेल," असे राहुल गांधी म्हणाले.