Maharashtra Politics: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमधील गुंतवणूक वाढीसंदर्भात योगी आदित्यनाथ यांचा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबई दौऱ्यावर असताना योगी आदित्यनाथ अनेक उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत. यावरून विरोधकांकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात येत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा आणि रोड शोवरून निशाणा साधला. पण भाजपाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
"अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर न पडणार्यांना योगीजींचा रोड शो काय समजणार? उरली सुरली शिवसेनाचे प्रवक्ते संजय राऊत म्हणतात, योगींचा रोड शो कशासाठी? आता यांना काय समजणार रोड शो? जे अडीच वर्षांत राज्यासाठी कधीच घराबाहेर पडले नाहीत. यांच्यासाठी एकच रोड शो होता, तो म्हणजे वर्षा ते मातोश्री, तोही कोरोना झालेला असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावर. घरात बसणारे बाहेर फिरणार्यांवर टीका करतात, तेव्हा हसावे की रडावे कळत नाही. क्या तुम भी संजुभाऊ?" अशा शब्दांत भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना सुनावलं.
काय म्हणाले होते संजय राऊत?
आपल्या दोन दिवसीय दौऱ्यात योगी आदित्यनाथ टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, महिंद्रा बाँबे डाइंग, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स,हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी आणि ओस्वाल इंडस्ट्रीज यासह अनेक बड्या उद्योगपतींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच संजय राऊत यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली असून, योगी आदित्यनाथ मुंबईत रोड शो का करत आहेत? अशी विचारणा केली आहे.
"राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री दावोसला जात आहेत. तिथे गुंतवणुकदारांची परिषद असते. तिथे जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोड शो करणार आहेत का? गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दावोसच्या रस्त्यावर रोड शो होणार आहे का? मग यूपीच्या मुख्यमंत्र्यांना ताज हॉटेलसमोर रोड शो करण्याची गरज काय? हे राजकारणाचे धंदे बंद करा. आपण आलात, तुमचा सन्मान आहे. तुम्ही सन्मानाने निघून जा. उद्योगपतींशी चर्चा करा. तुमच्याविषयी प्रेम आदर आहे तो राहील. फक्त राजकीय उद्योग करू नका. तुम्ही तुमच्या राज्याच्या विकासासाठी मुंबईचे योगदान घ्यायला आला आहात, तर रोड शो कशासाठी?" असे संजय राऊत म्हणाले.