संजय राऊतांना उच्च न्यायालयाकडून दिलासा, महिलेच्या तिन्ही याचिका फेटाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 08:00 AM2021-08-26T08:00:09+5:302021-08-26T08:06:43+5:30
Sanjay Raut : २०१३ व २०१८ दरम्यान केलेल्या तीन तक्रारींवर पोलीस तपास करण्याचे निर्देश द्यावे व झोन ३ च्या पोलीस उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने याचिकेद्वारे केली होती.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. राऊत यांच्या वतीने काही गुंड आपली छळवणूक करत होते, तसेच आपल्यावर पाळत ठेवून होते, असा आरोप एका ३९ वर्षीय उच्चशिक्षित महिलेने राऊतांवर केला. मात्र, उच्च न्यायालयाने बुधवारी त्या महिलेची याचिका फेटाळली.
२०१३ व २०१८ दरम्यान केलेल्या तीन तक्रारींवर पोलीस तपास करण्याचे निर्देश द्यावे व झोन ३ च्या पोलीस उपायुक्तांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार महिलेने याचिकेद्वारे केली होती.
संबंधित महिलेने राऊत यांच्याविरोधात तीन याचिका दाखल केल्या. त्यात हेरगिरी करणे, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, धाक दाखविणे यासारखे आरोप होते. न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने या महिलेच्या तिन्ही याचिका फेटाळल्या.
गैरसमजातून आरोप
- संजय राऊत यांनी न्यायालयात महिलेचे सर्व आरोप फेटाळले. याचिकादार महिलेसोबत माझे पूर्वीपासून कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. तिला आणि तिच्या पतीला मी पूर्वीपासून ओळखतो. त्या दोघांमध्ये वाद सुरू आहेत आणि त्यात मी पतीची बाजू घेत असल्याचे तिला वाटते. म्हणून, त्या
गैरसमजातूनच तिने माझ्याविरोधात विनाकारण आरोप केले आहेत. ती महिला मला माझ्या मुलीसारखीच आहे, असे राऊत यांनी न्यायालयाला सांगितले होते.
- मागील सात वर्षांपासून माझी मानसिक छळवणूक सुरू आहे. पोलिसांत तक्रारी दिल्यानंतरही कारवाई होत नाही, असा आरोप करत महिलेने ॲड. आभा सिंग यांच्यामार्फत उच्च न्यायालयात तीन याचिका केल्या होत्या.