बोम्मई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कानशिलात लगावतात आणि शिंदे चोळत बसतात, असा आरोप शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला होता. यावर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत हा पागल झालेला, पिसाळलेला कुत्रा आहे, त्याच्या कानशिलात वाजविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, ते ज्या प्रकारे वक्तव्ये करत आहेत, जिथे मिळेल तिथे संजय राऊत यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत बांगर यांनी टीका केली. यावेळी टीका करताना बांगर यांची जीभ घसरली. संजय राऊत यांनी पाच महिन्यांपूर्वी चाळीस रेडे कामाख्या देवीला बळी देणार असल्याचे वक्तव्य केले होते.
अमित शहा यांनी एकनाथ शिंदे आणि बोम्मईंना एकाच खोलीत बंद करावे तरच सीमाप्रश्नावर तोडगा सापडेल, असे पृश्वीराज चव्हाणांनी म्हटले होते. यावरही संतोष बांगर यांनी या लोकांना दुसरा काही काम उरलेले नाही. कुठली जागाच उरलेली नाही, त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असे म्हटले. ग्राम पंचायत निवडणुकीत दोन्ही बाजू आपणच आघाडीवर असल्याचे सांगत आहेत, त्यावर ग्राम पंचायतमध्ये मिडीयाने दाखविले आहे कोण पुढे आहे. त्यामुळे जनतेला विरोधकांच्या दाव्याचा काही फरक पडणार नाही, असे उत्तर दिले.
संजय राऊत आज काय म्हणालेले...खासदार संजय राऊत यांनीही याच प्रकरणावरुन शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा साधला आहे. तुम्ही कितीही रंग सफेदी कराल? भूखंड घोटाळा अतिशय गंभीर आहे तरीसुद्धा तुम्ही नाक वर करुन बोलत आहात. मला एक कळत नाही फडणवीस भ्रष्टाचाराच्या पाठिशी कशाला उभं राहत आहेत? "तुमचा निर्णय जर योग्य होता मग हायकोर्टानं स्थगिती का दिली याचं उत्तर द्या. बाकीचं काही सांगत बसू नका. तुम्ही किती रंग सफेदी कराल? घोटाळा झाला आहे आणि फडणवीस भ्रष्टाचाऱ्यांना का पाठिशी घालत आहेत? यात काय त्यांनाही वाटणी मिळालीय का? मांजर- बोक्याची वाटणी झाली आहे का?", असं संजय राऊत म्हणाले.