एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीमध्ये येण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले आणि राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी चर्चा सुरु झाली. यावर महाविकास आघाडी ही ऑफर स्वीकारणार का अशी चर्चा सुरु झालेली असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यास त्यांनी नकार दिला आहे.
राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. चौथा, पाचवा कोण असेल याची आतापासूनच चर्चा करण्याची गरज नाही. जे भाजपासोबत छुप्या युतीत काम करत आहेत, त्यांच्याशी महाविकास आघाडीत संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जे औरंगजेबाला मानतात त्यांचा शिवरायांना मानणाऱ्यांशी कोणताही संबंध येत नाही. एमआयएम ही भाजपाची बी टीम आहे. सर्व राज्यांत आपण हे पाहिलेले आहे. औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणाऱ्यांसोबत आमची आघाडी कशी होईल, हे तुम्ही कसा विचार करू शकता. त्यांना दूरुनच नमस्कार, अशा शब्दांत राऊत यांनी एमआयएमची ऑफर धुडकावली आहे.
उद्या मी बोललो भाजपाचे ५० आमदार आमच्यासोबत आहेत. तेवढे आहेतच. पण आघाडीचे २५ आमदार सोबत आहेत म्हणणाऱ्यांना रात्रीची नशा उतरली की सकाळी काही आठवत नाही, अशी अवस्था आहे, अशा शब्दांत राऊत यांनी रावसाहेब दाणवेंना फटकारले.