मुंबई - उद्धव ठाकरेंनी आता भेटायला सुरूवात केली चांगले आहे. राऊतांनी त्यांच्यासाठी मोठी लढाई लढली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना भेटणे आनंदाची बाब आहे. याआधी इतर लोकांवरही कारवाई झाली होती. भावना गवळी, यामिनी जाधव, आनंदराव अडसुळ यांच्यावरही कारवाई झाली परंतु त्यांना भेटायला गेले नव्हते. प्रत्येकाने स्वत: वरील कारवाईला सामोरे गेले होते. संजय राऊतांनी जर पुरावे सादर केले असते तर त्यांनाही दिलासा मिळाला असता अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, संजय राऊत निर्दोष असतील तर ते कोर्टासमोर पुरावे सादर करतील. जर त्यांच्याकडे निर्दोष असलेले पुरावे नसतील तर त्यांना कस्टडीत राहावं लागेल. संजय राऊत यांना ईडीने सातत्याने मुदत दिली होती. आजच्या कारवाई केवळ राजकीय व्यक्तींवरच नाही तर अनेक बिल्डरवर पण झाल्या आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच माझा संघर्ष हा कोकणातल्या शांततेसाठी होता. आदित्य ठाकरेंबद्दल प्रेम आहे. संजय राऊतांनी तिथेच राहिले पाहिजे. उगाच राजकीय मुद्दा बनवू नये. प्रविण राऊतांवर कारवाई केल्यानंतर कित्येक दिवसांच्या कालावधीनंतर ही कारवाई झाली आहे. निर्दोष असतील तर त्यांनी सिद्ध करावं. ज्या शिवसेनेने भाजपाला फसवलं. राज्यातील जनतेला फसवलं त्यांच्याबद्दल भाजपा अध्यक्षांचं विधान असावं असं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिले.
दरम्यान, २ दिवसांपूर्वी जी ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. त्यात महिलेला ईडीला दिलेला जबाब बदला अशाप्रकारे दबाव टाकण्यात आला. ईडी प्रकरणात पुरावे बदलणे गुन्हा आहे. पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरे मिळत नाही. अशाप्रकारे गरिब जनतेला गृहित धरता येणार नाही. राज्यातील मोठमोठे बिल्डर्स आरोपाखाली जेलमध्ये आहेत. कुणावरही आकसापोटी कारवाई झाली नाही. संजय राऊतांविरोधात कारवाई व्हावी अशी कुठलीही मागणी आम्ही केली नव्हती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीवारी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होती. संजय राऊत यांना दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर राष्ट्रवादी वगळता इतर कुठलाही पक्ष त्यांना घेणार नाही अशी टीका दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर केली आहे.