मुंबई/नवी दिल्ली: राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांच्या निकटवर्तीयांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले आहेत. त्यानंतर राऊत यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझ्यावर ठाकरे सरकार पाडण्यासाठी दबाव पाडण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे. यामध्ये तुम्ही हस्तक्षेप करावा, अशी मागणी राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पाठवण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांना पत्र लिहिलं आहे. राऊत यांनी ईडीवर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ईडीनं माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कट रचल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी पत्रांचा फोटो ट्विटरवर शेअर करत 'सत्यमेव जयते' म्हटलं आहे.
माझ्या मुलीच्या लग्नात काम देण्यात आलेल्या वेंडर्सना त्रास देण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. लेकीच्या लग्नात डेकोरेशनचं काम केलेल्या लोकांना ५० लाख रुपये देण्यात आल्याचं वदवून घेण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. पीएमएलए प्रकरणात मला फसवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे, असं राऊत यांनी पत्रात नमूद केलं आहे.
राऊत यांनी उपराष्ट्रपती नायडू यांना पाठवलेलं पत्र राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वी काही लोकांनी राज्यातील सरकार पाडण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला होता. राज्यात मध्यावधी निवडणूक व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पण मी त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला, असं राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.
मदत न केल्यास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकी त्या लोकांनी मला दिली होती. माझ्यासोबतच राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री आणि दोन वरिष्ठ नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकीदेखील देण्यात आली होती, असाही उल्लेख राऊत यांनी पत्रात केला आहे.