मुंबई – संजय राऊत यांना महाराष्ट्रात नव्हे तर त्यांच्यात कुटुंबात बायकोही सिरियसली घेत नसतील. संजय राऊत उठून आरोप करतात. १ वर्षापूर्वी आमच्यासोबत होते, तेव्हा राऊतांना आजचे आरोप आठवले नाहीत. संजय राऊत काळ आणि वेळ बघून आरोप करतात. त्यांच्या भावना दुखावल्यात म्हणून आरोप करतायेत. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. स्वार्थासाठी आणि प्रसिद्धीसाठी आरोप केले जातात असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी दिले आहे.
सुरज चव्हाण म्हणाले की, आम्ही काम करणारे लोकं आहोत. महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न सोडवणारे नेतृत्व म्हणून अजित पवारांची ओळख आहे. सकाळी ६ वाजल्यापासून दादा काम करतात. संजय राऊतांना रोज सकाळी आरोप करायचे आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे ही सवय झाली आहे. त्यामुळे यापलीकडे त्यांचे कुठलेही कर्तृत्व या महाराष्ट्राच्या जडणघडणीत नाही हे राज्याला माहिती आहे. आम्ही प्रत्युत्तर द्यायला आणि समजेल अशा भाषेत उत्तर द्यायला युवक संघटना सक्षम आहे असंही त्यांनी म्हटलं.
तर युवा संघर्ष यात्रा ही नेमकी युवकांच्या प्रश्नावर निघाली आहे, विचारधारा टिकवण्यासाठी निघाली आहे का हा प्रश्न आहे. कारण हेच रोहित पवार ज्यांनी भाजपाला पाठिंबा द्यावा या पत्रावर सही केलेले आहेत. रोहित पवारांनी आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन शरद पवारांना भेटत मतदारसंघातील प्रश्नांसाठी भाजपासोबत गेले पाहिजे हे सांगणारे आहेत. बेरोजगार तरुणांना किती नोकऱ्या दिल्या? सत्तेत असताना एक आणि विरोधात असताना दुसरी भूमिका घ्यायची. या संघर्ष यात्रेची दिशा चुकली आहे. पक्षातंर्गत संघर्ष करावा लागतोय ही यात्रा नागपूरऐवजी इस्लामपूरला नेली असती तर न्याय मिळाला असता अशी टीका सुरज चव्हाण यांनी रोहित पवारांवर केली.
दरम्यान, रोहित पवारांना पक्ष संघटना साथ देत नाही. स्वत:चे नेतृत्व घडवण्यासाठी ही यात्रा काढतायेत. त्यात पक्षाला कुठेही फायदा होणार नाही. रोहित पवार महाराष्ट्रातील युवा वर्गाला फसवण्याचे काम करतायेत. कंत्राटी भरती हा उद्धव ठाकरेंच्या काळात झालेला निर्णय आहे तेव्हा रोहित पवारांना माहिती नव्हते का? रोहित पवार ज्या मार्गावरून जातील त्या मार्गावर रोहित पवारांना आरसा दाखवण्याचे काम राष्ट्रवादी युवक काँग्रेस करेल असंही सुरज चव्हाणांनी म्हटलं.