नाशिक – शहरातील मोर्चा हा राजकीय नसून सामाजिक कारणासाठी आहे. नाशिक तीर्थस्थळ ड्रग्जसाठी कुप्रसिद्ध होत आहे. गल्लीबोळात, पानटपरीवर ड्रग्ज पोहचले आहे त्यासाठी हा मोर्चा आहे. नाशिकच्या मोर्चाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. कुणीतरी याकडे लक्ष द्यायला हवा. आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक सुरू आहे. अनेक मंत्री, आमदारांची नावे पुढे आलीत. राजकीय आणि पोलिसांच्या वरदहस्ताशिवाय ड्रग्जचा कारखाना चालू शकत नाही. नाशिकच्या ड्रग्जचे मालेगावपर्यंत सूत्रे आहेत. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहेत. काही मंत्री आणि आमदारांना हफ्त्यातून पैसे मिळतात त्याचे आकडे पोलीस सूत्रांनी मला दिलेत असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ललित पाटील यांच्या मैत्रिणी विधानसभेपर्यंत आहेत. त्यांना इथून हफ्ता जात होता. हे आकडे महिन्याला १०-१५ लाखांचे आहे. सत्तेतील आमदार यात सहभागी आहेत. मंत्र्यांवर आरोप झालेत, पोलिसांवर आरोप आहेत. त्यांनी शिवसेनेने मोर्चाची घोषणा करताच कारवाईला सुरुवात केली. हा मोर्चा आम्ही हाती घेतल्यावर पानटपऱ्यांवर धाडी पडल्या. नाशिक आणि मालेगावपर्यंत ड्रग्जचा व्यापार केवळ एका दोघांच्या नियंत्रणाखाली नसून त्याचे धागेदोरे गुजरात, इंदूरपर्यंत पोहचले आहेत. गुजरातच्या ड्रग्जचे धागेदोरे पाकिस्तान, अफगाणिस्तानपर्यंत पोहचलेत हे सगळ्यांना माहिती आहे. तरुणपिढीला ड्रग्जच्या विळख्यात ओढले जातंय. हा मोर्चा सामाजिक प्रश्न आहे. त्यात अनेक शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांना मोर्चात पाठवणार होते. परंतु सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये असं पत्रक काढलंय. विधान परिषदेच्या उपसभापतीचा राजकारणाशी संबंध काय, तुमचे हे काम नाही. नीलम गोऱ्हेंनी नाशिकला येऊन जिल्हाधिकारी बैठकीत शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होऊ नये अशा सूचना केल्या आहेत. आम्ही लढाई सुरू केलीय, तुम्ही ड्रग्ज रॅकेटच्या सदस्या आहे का? तुम्ही राजकीय विधाने कशी करू शकता? महाराष्ट्र सरकार नशेच्या बाजारात गुंतलंय का? अशी शंका आम्हाला येते असा आरोप त्यांनी केली.
तसेच देवेंद्र फडणवीसांकडे फार लक्ष देऊ नका, ते भरकटलेले आहेत. फडणवीस भांग पीत नसतील परंतु त्याच्या वासाने नशा येत असेल. त्यांच्या आसपास जी लोकं आहेत, नशेच्या बाजारात फिरतायेत त्यांच्यामुळे फडणवीसांची मती गुंग झाली आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, एक पिढी बर्बाद होताना दिसतेय आणि तुम्ही राजकारण करताय. तुमच्या सरकारी बंगल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्याकडून पोलीस उपायुक्तावर हल्ला झाला तुम्ही काय करताय? डीसीपींची कॉलर पकडली. या महाराष्ट्राला असे गृहमंत्री लाभले हे दुर्देव आहे. महाराष्ट्राने अनेक चांगले गृहमंत्री लाभलेत, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळली आहे. सूडाने कारवाया केल्या नाहीत. तुमच्या आजूबाजूला जे गुंड, माफिया बसलेत तुम्ही त्यांची बाजू घेता. धन्य आहे तुम्ही अशा शब्दात संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
दरम्यान, गृहमंत्र्यांकडे सगळी माहिती आहे, राजकीय विरोधकांची माहिती असते, ड्रग्जमाफियांची माहिती नाही का? काही घटना घडली तर विरोधकांच्या माथी थोपवायचे. आम्ही पाहू...काय करणार तुम्ही, काय उखडायचे ते उखडा, हा महाराष्ट्र आम्हाला वाचवायचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना वाचवायचे आहे. तुम्ही कोणाची बाजू घेताय? ड्रग्ज गुजरातमधून येते, गुजरातला वाचवताय? सत्तेतील आमदारांना वाचवताय? खोटी प्रकरणे निर्माण करून विरोधकांना बदनाम करताय? असा सवालही संजय राऊतांनी फडणवीसांना केला.
सत्ताधारी आमदारांना ड्रग्जमधून हफ्ता
पुरावे आणि माहिती असण्यात फरक आहे. काही पोलीस अधिकारी चांगले आहेत. सामाजिक भान असलेले पोलीस राज्यात आणि नाशिकमध्ये आहे. त्यांना नाशिकमधील प्रकरणाची माहिती आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना आणि पोलिसांना ड्रग्ज व्यापारातून मासिक किती हफ्ते मिळतात याची माहिती आहे. समजने वाले को इशारा काफी आहे. एका आमदाराला १६ लाख हफ्ता मिळतो, असे ६ आमदार आहेत. हे रॅकेट साधे सोपे नाही तर मोठे आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिष्ठा सांभाळावी. फडणवीस प्रचंड नैराश्येत आहेत. मी त्यांची वेदना आणि दु:ख समजू शकतो असं संजय राऊतांनी दावा केला. त्याचसोबत ललित पाटील शिवसेनेत आणला गेला, तेव्हाचे संपर्कप्रमुख हे शिंदे गटातच आहे. दादा भुसे आणि अजय बोरसे हे दोघे होते. ते दोघेही सरकारमध्ये आहेत. त्या बाईंना सांगा असं म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली.