मुंबई - विधिमंडळ हे चोरमंडळ झालंय अशा विधानामुळे अडचणीत आलेल्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी त्यांच्या वादग्रस्त विधानावर सारवासारव केली आहे. मी विधिमंडळाचा अपमान केला नाही आणि कधीच करणार नाही. ज्या विधिमंडळाने मला निवडून दिले, ज्या विधिमंडळाने शिवसेनेला सत्ता दिली त्याबद्दलच्या माझ्या भावना बहुमुल्य आहेत. सभागृहाचं महत्त्व मला माहिती आहे पण गेल्या ६ महिन्यापासून चोरमंडळाने हे सभागृह हायजॅक करण्याचा प्रयत्न केलाय त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले आहे.
संजय राऊत म्हणाले की, सर्वोच्च सभागृहाचा मी सदस्य आहे. विधिमंडळ असो वा संसद या दोन्ही सभागृहाचा मी आदर केला आहे. राज्यसभेच्या कामकाजात सर्वाधिक काळ सहभागी होणारा मी सदस्य आहे. संसदीय लोकशाहीवर मी कायम विश्वास ठेवला आहे. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी काय म्हणालो आणि कोणत्या संदर्भात म्हणालो हे समजून न घेता एकांगीपद्धतीने कारवाई होत असेल तर ते लोकशाहीला आणि लोकशाही परंपरेला धरून नाही असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत माझ्यावर हक्कभंग आणण्याचा अधिकार सदस्यांना आहे. त्यावर चर्चा होईल. मी त्याला उत्तर देईन. मी काय म्हणालो हे समजून घेतले पाहिजे. विरोधकांना देशद्रोही म्हटलं जाते. काही लोक शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करून विधिमंडळात गेले आणि सरकार स्थापन केले. आमच्यावर ते हल्ले करतायेत. त्यांचा उल्लेख विधिमंडळाबाहेर चोर, दरोडेखोर असा केला जातो. ही लोकभावना आहे. ज्यांनी बेईमानी, गद्दारी केली या लोकांनी विधिमंडळाचं अशाप्रकारे रुपांतर केले आहे. ते स्वत: चोर आहेत त्यांच्यामुळे विधिमंडळाची चोरमंडळ बदनामी होते ती थांबायला पाहिजे असं संजय राऊत यांनी सांगितले.
दरम्यान, चोरांवर संस्कार नसतात. त्यांच्याकडून काही अपेक्षा करू शकत नाही. माझ्यावर हक्कभंग आणला असेल तर मी समितीसमोर जाईन. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो. मी चोऱ्यामाऱ्या केल्या नाहीत. मी पक्षाचा नेता आहे. मी आयुष्यात कधीही घाबरलो नाही. न घाबरता तुरुंगवास भोगला. महागाई, बेरोजगारी, खोक्याचे राजकारण, शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न यावरून लक्ष हटवण्यासाठी संजय राऊतांना लक्ष्य केले. माझी पक्षप्रमुखांशी चर्चा झाली आहे असंही संजय राऊत म्हणाले.